नव्या हिंदुस्थानचे नवे हिरो! केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून कौतुकाची थाप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिक गाजवून मायदेशी परतलेल्या हिंदुस्थानी खेळाडूंचा नवी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये गौरव करण्यात आला. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, क्रीडा राज्य मंत्री निसीथ प्रामाणिक, माजी क्रीडा मंत्री व विद्यमान कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते ऑलिम्पियन खेळाडूंना गौरविण्यात आले. ‘तुम्ही सर्व खेळाडू हे नव्या हिंदुस्थानचे नवे हिरो आहात’ अशा शब्दांत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

अनुराग ठाकूर म्हणाले, देशातील 135 कोटी जनतेच्या वतीने मी तुम्हा सर्व ऑलिम्पियन खेळाडूंना शुभेच्छा देत आहे. नीरज चोप्रा, तू फक्त पदकच नव्हे तर तमाम देशवासीयांची मनेही जिंकली आहेस. आगामी ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू याहून अधिक सरस कामगिरी करतील याचा मला विश्वास वाटतोय. आगामी ऑलिम्पिकसाठीच्या तयारीत आमच्याकडून कुठलीच कसर राहणार नाही, अशी ग्वाहीही क्रीडा मंत्र्यांनी खेळाडूंना दिली.

हॉकी संघाने केक कापून साजरा केला आनंद

कास्य पदक विजेता पुरुष हॉकी संघ व थोडक्यात कास्य पदकाने हुलकावणी दिलेला महिला हॉकी संघ यांनी अशोका हॉटेलमध्ये दाखल होताच केक कापून आनंद साजरा केला. या वेळी खेळाडूंनी केलेला जल्लोष बघण्यासारखा होता. यानंतर कास्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाचा सत्कार करण्यात आला. मी कास्य पदकाची लढत गुडघ्याच्या कॅपशिवाय खेळलो. माझ्या गुडघ्याला दुखापत झाली असती, तर मला विश्रांती घ्यावी लागली असती. मात्र ही लढत माझं आयुष्य बदलणारी होती. त्यामुळे कास्य पदकाच्या लढतीत मी सर्वोत्तम खेळ करण्यात कुठलीच कसर सोडली नाही, असे बजरंग पुनियाने सांगितले. कास्य पदक विजेती बॉक्सर लवलीना बोर्गोहेन व महिला बॉक्सिंग टीमचे प्रशिक्षक राफेल बरगमॅस्को यांनाही क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आगामी ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण पदक जिंकून देईन, असा निर्धार लवलीना हिने व्यक्त केला.

हे सुवर्ण पदक देशवासीयांचे – नीरज चोप्रा

सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने सत्कारासाठी येताच आपले पदक हात वर करून सर्वांना दाखविले. तो म्हणाला, ‘‘मी हे सुवर्ण पदक देशासाठी जिंकले आहे. त्यामुळे हे पदक माझ्या एकटय़ाचे नसून संपूर्ण देशाचे आहे. खरं सांगायचं म्हणजे ऑलिम्पिकमध्ये हे ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यापासून मी नीट खाऊ शकलो नाही, की नीट झोपू शकलो नाही,’’ अशा शब्दांत नीरज चोप्राने आपल्या भावना व्यक्त केल्या. रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया याने ‘‘देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्यात यशस्वी ठरलो, याचा आनंद वाटतो,’’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.