
‘इंडिगो’ या देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीला मोठा फटका बसला आहे. ‘नागरी विमान वाहतूक संचालनालयाने’ (डीजीसीए) सुरक्षेसंदर्भात लागू केलेल्या नव्या नियमांमुळे इंडिगोमध्ये अचानक मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू लागला. परिणामी गुरुवारी मुंबई, दिल्ली, पुण्यासह देशातील 10 विमानतळांवर इंडिगोची 300 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली. चार दिवसांमध्ये तब्बल 1,500 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर उड्डाणे रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. अनेक ठिकाणी प्रवाशांची एवढी गर्दी झाली आहे की, पाय ठेवायला जागा नाही.
वैमानिक व चालक दलाच्या कामाशी संबंधित सुरक्षेच्या नियमांमध्ये झालेले बदल लागू करण्यात आले आहेत. याचा सर्वाधिक फटका इंडिगो एअरलाईन्सवर झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून इंडिगोची 1,232 विमाने रद्द झाली. यापैकी 755 उड्डाणे ही नव्या नियमांमुळे रद्द झाली आहेत, अशी माहिती ‘डीजीसीए’ने दिली. गुरुवारी तर प्रचंड फटका बसला. दिल्ली येथे 95, मुंबईत 86, बंगळुरू येथे 50, हैदराबाद येथे 70 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली.
इंडिगोवर सर्वाधिक परिणाम का?
इंडिगो ही देशातील सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी आहे. देशातील नागरी विमान वाहतुकीत तब्बल 63 टक्के वाटा इंडिगोचा आहे. त्याखालोखाल एअर इंडियाचा 13 टक्के वाटा आहे. त्यामुळे 10 ते 20 टक्के विमानांवर परिणाम झाला, तर सुमारे 200 ते 400 उड्डाणांवर परिणाम होतो.
‘डीजीसीए’चे नवीन नियम कोणते?
‘डीजीसीए’ने ‘फ्लाईट डय़ुटी टाईम लिमिटेशन’ (एफडीटीएल) या नावाने वैमानिक आणि चालक दलासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. त्याचा पहिला टप्पा 1 जुलै आणि दुसरा टप्पा 1 नोव्हेंबरपासून लागू झाला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वैमानिक आणि चालक दलाला पुरेसा आराम देण्यावर भर देण्यात आला आहे. सात दिवस काम केल्यानंतर 48 तासांचा आराम, नाईट लँडिंगसाठी आता सहाऐवजी दोन लँडिंगची परवानगी, सलग दोन रात्रींपेक्षा जास्त नाईट शिफ्टला परवानगी नाही, नाईट शिफ्टदेखील आता मध्यरात्री 12 ते 6 असेल, लांब पल्ल्याच्या उड्डाणानंतर वैमानिकांना आराम इत्यादी नियमांचा त्यात समावेश आहे. यामुळे प्रत्यक्ष उपलब्ध मनुष्यबळ कमी झाले. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली.


























































