खुशखबर! Indigo एअरलाइन्सने महिलांसाठी आणली ही खास सुविधा

प्रवासादरम्यान महिलांना होणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी देशांतर्गत विमाम कंपनी Indigo ने प्रवाशी महिलांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे आता महिलांना आपली आवडती सीट बुक करता येणार आहे.

एकटी महिला प्रवासी प्रवास करत असेल तर, त्यांना बऱ्याच वेळा अनोळखी पुरुषाच्या बाजूला बसून प्रवास करावा लागतो. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी इंडिगोने महिलांसाठी खास सुविधा सुरू केली आहे. या सुविधेनुसार आता महिलांना वेब चेक-इन दरम्यान सीट निवडताना इतर महिलांनी कोणती सीट आधीच बुक केलेली आहे ते पाहता येणार आहे. त्यामुळे एका महिला प्रवाशाला दुसऱ्या महिलेच्या शेजारी जर सीट हवी असेल तर ती सीट बुक करता येणार आहे.

महिलांना प्रवासादरम्यान सुरक्षित आणि आरामदायी अनुभव मिळावा यासाठी इंडिगोने ही विशेष सुविधा सुरू केली आहे. “ही सुविधा सुरू करण्यापूर्वी बराच रिसर्च करण्यात आला. त्यानंतर महिला प्रवाशांसाठी विशेष PNR तयार करण्याची योजना आखण्यात आली. जेणेकरून संबंधित महिलेला इतर महिलांच्या जागांची माहिती मिळण्यास मदत होईल. पण ही सेवा फक्त त्या महिलांनाच उपलब्ध असेल ज्या वेब चेक-इन करतील, ” असे इंडिगोने सांगितले.