
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिने आता एक धक्कादायक दावा केला आहे. शीना ही जिवंत असून ती सध्या कश्मीरमध्ये राहतेय असा दावा इंद्राणीने केल्याचे समजते. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. तपास यंत्रणांनी कश्मीरमध्ये जाऊन शीनाचा शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.
शीना बोरा हिची हत्या केल्याप्रकरणी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना, ड्रायव्हर श्यामवर रॉय, इंद्राणीचा तिसरा पती आणि मीडिया बॅरान पीटर मुखर्जी या चौघांना अटक करण्यात आली होती. श्यामवर रॉयच्या अटकेनंतर शीना बोराची हत्या झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आधी इंद्राणीला मुंबईहून, तर खन्ना याला कोलकाता येथून अटक केली. तर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर 19 नोव्हेंबर 2015 रोजी पीटर मुखर्जी याला अटक करण्यात आली. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर त्यात आपला कोणताही संबंध नाही हे सातत्याने दाखविण्याचा पीटरचा प्रयत्न राहिला; परंतु सीबीआयने कसोशीने तपास करून त्याला तुरुंगात डांबले. इंद्राणीच्या अटकेनंतर तब्बल तीन महिन्यांनी पीटरला अटक झाली. या हत्याकांडाप्रकरणी इंद्राणी 2015 पासून भायखळा कारागृहात शिक्षा भोगत आहे.





























































