इन्फोसिसवरील संकटे सरेनात! आता वही-खात्यात ‘हेराफेरी’चा आरोप

811

देशातील दुसरी सर्वात मोठी माहिती-तंत्रज्ञान (आयटी) फर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इन्फोसिसवरील संकटे संपण्याची चिन्हेच दिसत नाहीत, अशी कंपनीची अवस्था झाली आहे. कंपनीचे माजी सीईओ विशाल सिक्का- नारायण मूर्ती यांच्यात पेटलेला वाद मिटतो न मिटतो तोच आता कंपनीच्या काही अज्ञात कर्मचाऱ्यांनी व्हिसल ब्लोअर बनत फर्मच्या वही बुकात संचालकांनी आकडय़ांची ‘हेराफेरी’ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अखेर हे प्रकरण निपटण्यासाठी कंपनीने ऑडिट समितीकडे सोपवले आहे.

कंपनी आपले उत्पन्न आणि नफा वहीत चुकीचा लिहीत असल्याचे तक्रारपत्र या कर्मचाऱयांनी इन्फोसिस बोर्ड आणि यूएस सिक्युरिटी एक्सचेंज समितीला पाठवले आहे. शिवाय नवे सीईओ सलील पारेख वही खात्यात नोंद केलेले खोटे आकडे मान्य करावे म्हणून कर्मचाऱयांवर दबाव आणत असल्याचेही तक्रारदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

इन्फोसिस म्हणते, वहीत कोणताही घोटाळा नाहीय
कंपनीच्या वही बुकात कोणत्याही खोटय़ा नोंदी नाहीत. व्हिसलब्लोअर्सनी केलेली तक्रार तपासण्यासाठी इन्फोसिसच्या ऑडिट समितीकडे पाठवली आहे. कंपनीच्या ‘व्हिसलब्लोअर’ धोरणानुसार कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱयांवर झालेल्या आरोपांची शहानिशा करून आरोपांचे निवारण केले जाईल, असे इन्फोसिस संचालक बोर्डाने स्पष्ट केले आहे.

इन्फोसिसने व्हेरीजॉन, एनीएन ऍम्रो आणि जपानी कंपन्यांशी केलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या सौद्यांत ‘काळेबेरे’ असल्याचा आम्हाला संशय आहे. हा घोटाळा लपविण्यासाठी सीईओ पारीख आर्थिक समितीवर दबाव आणत आहेत. आमच्याकडे यासंदर्भात भक्कम पुरावे आणि ध्वनिमुद्रणाचे रेकॉर्डस् आहेत. कंपनीचे बोर्ड या अनियमिततेची चौकशी करून त्यावर कडक कारवाई करील अशी आशा आहे.
– माहिती अधिकार कार्यकर्ते

आपली प्रतिक्रिया द्या