इनहेलर ठेवेल अस्थमा रुग्णांना कोरोनापासून दूर!

मे महिन्याचा पहिला मंगळवार हा अस्थमाच्या जनजागृतीसाठी ‘जागतिक अस्थमा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यंदा कोरोनामुळे जगात हाहाकार माजला आहे. अनेकांना कोरोनाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अस्थमासारखे श्वसनविकार असलेल्या रुग्णांनी या काळात कशी काळजी घ्यावी याबाबत शीव रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ञ डॉ. नीलकंठ आवाड यांच्याशी केलेली बातचीत.

 अस्थमा रुग्णांनी कोणती दक्षता घ्यायला हवी?
– अस्थमा रुग्णांच्या फुप्फुसांची क्षमता आधीच कमी असते. अशा रुग्णांमध्ये दम लागणे, रात्रीच्या वेळी खोकला, झोपल्यानंतर घशातून शिट्टीसारखा आवाज येणे अशी लक्षणे आढळतात. अशा रुग्णांना इनहेलर उपचार पद्धती अधिक परिणामकारक ठरते. हेच इनहेलर त्यांना कोरोनापासून दूर ठेवू शकते.

 इनहेलर या रुग्णांसाठी कशा प्रकारे लाभदायक ठरते?
– जर रुग्ण वेळेत डॉक्टरांनी सांगितल्यानुसार इनहेलरचा उपयोग करीत असेल तर अशा रुग्णांना कोरोनाचा फारच कमी धोका आहे. इनहेलरमध्ये काही प्रमाणात स्टिरॉइड असतात. हे श्वसननलिकांमधून फुप्फुसात पोहोचतात. या स्टिरॉइडमुळे श्वसननलिकांना येणारी सूज आपोआप कमी होते. त्याचप्रमाणे इनहेलरमुळे कोरोनाच काय अन्य कोणत्याही विषाणूचा संसर्ग फुप्फुसाला होऊ शकत नाही. त्यामुळे योग्य उपचारांचा वापर करून आपला दमा आटोक्यात ठेवल्यास त्यांना कोरोनाचा धोका नाही.

 आणखी कोणते उपाय कोरोनापासून दूर ठेवू शकतात?
– अस्थमाच्या रुग्णांना आम्ही दीर्घ श्वसनाचा सल्ला देतो. दीर्घ श्वसनासारखे श्वसनाचे व्यायाम केल्यानेही फुप्फुसांची क्षमता वाढते. दिवसातून कमीत कमी अर्धा तास चालणे यासारख्या व्यायाम आणि मास्कचा वापर यामुळे आपल्याला कोरोनापासून दूर राहता येईल.

 तरीही कोरोना झालाच तर काय?
– सर्व काळजी घेतल्यानंतरही कोरोना झाला तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घ्यावेत. त्याचप्रमाणे अस्थमाची औषधे म्हणजेच इनहेलर आदी. आणि कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जी औषधे आहेत ती घ्यावीच लागतील. त्याचप्रमाणे उताणे झोपणे, कुशीवर झोपणे यांसारख्या प्रकाराने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवता येते. एकच लक्षात ठेवावे की कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून त्यावर योग्य उपचार घेणे हाच उत्तम पर्याय आहे. कोणताही आजार असो, सहव्याधी असोत प्रत्येकाने लस ही घ्यायलाच हवी.

आपली प्रतिक्रिया द्या