
सामना प्रतिनिधी,जळगाव
राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणारे एक पत्र भाजपचे जळगावातील आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडवरून सर्वोंच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे करण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या लेटरहेडचा गैरवापर झाला असून आपण अशी काही मागणी केली नसल्याचा खुलासा आमदार भोळे यांनी केला आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी रीतसर लेखी तक्रारही दिली आहे.
माजी मंत्री खडसे हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे कोटय़वधींची मालमत्ता आहे. त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्यात यावी असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. के. ताहिलीरमानी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या लेटरहेडवर आमदार भोळे यांच्या स्वाक्षरीची नकल करण्यात आली असून त्यावर जावक क्रमांकही टाकलेला नाही.
दरम्यान, खडसे हे माझे नेते असून गुरूही आहेत. त्यांच्याशी असलेले संबंध बिघडावेत म्हणून कोणी तरी हा खोडसाळपणा केला आहे. मला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे असे आमदार सुरेंश भोळे यांनी म्हटले आहे. हे आपले जुने लेटरहेड असून त्याचा गैरवापर झाला असल्याचे भोळे म्हणाले. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे भोळे यांनी या प्रकरणी लेखी तक्रार दिली आहे.
नोटा बदलल्याची चौकशी दडवली
खडसे यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. नोटाबंदीच्या काळात त्यांनी कोटय़वधींच्या नोटा बदलल्या. त्याची सीबीआय चौकशीही झाली, परंतु ती दडपून टाकण्यात आली असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.

































































