ऐतिहासिक युद्धनौकेचा अखेरचा प्रवास, ‘आयएनएस विराट’सप्टेंबरमध्ये मुंबईतून गुजरातला नेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 30 वर्षे हिंदुस्थानी नौदलाच्या सेवेत राहिलेली ‘आयएनएस विराट’ ही युद्धनौका लवकरच इतिहासजमा होणार आहे. गुजरातच्या श्रीराम ग्रुपने गेल्या महिन्यात लिलावात 38.54 कोटींची बोली लावून या युद्धनौकेची खरेदी केली असून ती पुढील महिन्यात मुंबईतून गुजरातला हलवण्यात येणार आहे. लवकरच या युद्धनौकेच्या तोडकामाला सुरुवात केली जाणार आहे, असे श्री राम ग्रुपचे अध्यक्ष मुकेश पटेल यांनी मंगळवैरी सांगितले.

1987 साली नौदलात रुजू झालेली ‘आयएनएस विराट’ सर्वाधिक काळ नौदलाच्या सेवेत राहिली. मार्च 2017 मध्ये ही युद्धनौका नौदलातून सेवानिवृत्त झाली असून ती आता भंगारात निघणार आहे. सध्या मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये असलेली ही युद्धनौका पुढील महिन्यात गुजरातच्या अलंग येथील ब्रेकिंग यार्डमध्ये रवाना केली जाणार आहे. आम्ही सरकारकडे सर्व रक्कम जमा केली असून डिलिव्हरी ऑर्डरही मिळवली आहे. आता पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सप्टेंबरच्या मध्यावर किंवा अखेरीस ही युद्धनौका ब्रेकींग यार्डमध्ये नेली जाईल. तत्पूर्वी शिपिंग महासंचालनाची मान्यता घेतली जाईल, असे श्रीराम ग्रुपचे मुकेश पटेल यांनी स्पष्ट केले.

नऊ ते बारा महिन्यांत भंगारात निघणार
‘आयएनएस विराट’ला मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमधून गुजरातमधील अलंग येथील ब्रेकींग यार्डमध्ये नेण्यासाठी साधारण तीन दिकवस लागणार आहेत. हे यार्ड देशातील पहिले इको-फ्रेंडली शिप रिसायकलिंग यार्ड आहे. याठिकाणी पुढील नऊ ते बारा महिन्यांत युद्धनौका भंगारात काढली जाणार आहे.