
राज्यातील शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा राज्य सरकारचा अट्टहास तर्कहीन, हेतुपुरस्सर शिक्षकांना अपमानित करणारा आहे, असा आरोप राज्य शिक्षक सेनेने केला आहे. आतापर्यंत शिक्षक आक्षेपार्ह पोशाख करतात असे कुठे आढळून आले आहे का, असा सवाल उपस्थित करीत अनुकरणप्रिय असणाऱया विद्यार्थ्यांचे आदर्श असलेल्या शिक्षकांना स्वतःवरील जबाबदारीची, नैतिकतेची आणि सभ्यतेची पुरेपूर जाणीव आहे, अशी भूमिका शिक्षक सेनेने मांडली आहे.
राज्यातील सर्वच व्यवस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारने नवीन ड्रेसकोड लागू करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, व्यवस्थित नसेल तर त्याचा अप्रत्यक्ष एकंदरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो, असा तर्क काढत शिक्षकांसाठी नवीन ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांकडून या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे. राज्य शिक्षक सेनेनेही या निर्णयाविरोधात आवाज उठविला असून मंत्रालयीन कर्मचारी आणि सरकारी आस्थापनेवरील सुमारे 10 लाख कर्मचाऱयांना पेहरावाबाबत कोणतेही बंधन नसताना केवळ शिक्षकांनाच ड्रेसकोडची सक्ती कशासाठी, असा सवाल राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी केला आहे.
महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवाशर्ती) अधिनियम 1977, आरटीई कायदा 2009, तसेच शिक्षकांच्या नियुक्ती आदेशातही पेहरावाबाबतच्या कर्तव्याचा कुठेही उल्लेख नाही. आरटीई (2009) च्या कलम 24 मध्ये शिक्षकांची 6 कर्तव्ये दिली आहेत. तसेच आरटीई (2011) मधील नियम 10 मध्ये शिक्षकांच्या शिस्तीविषयक 8 कर्तव्ये दिली आहेत. दोन्ही ठिकाणी पेहरावाबाबत उल्लेख नाही. त्यामुळे पेहरावाबाबत राज्य सरकारचे आदेश म्हणजे शिक्षकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदाच आहे.
पेहरावाचा भुर्दंड शिक्षकांनी का सोसावा?
शिक्षकांच्या पेहरावासाठी सरकारकडून कोणतीही व्यवस्था केली जाणार नाही. पेहराव ठरविण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापकांची असून ते जो पेहराव ठरवतील तो पेहराव शिक्षकांनीच उपलब्ध करायचा आहे. त्यामुळे पोशाखाचा भुर्दंड शिक्षकांनी का सोसावा? अंशतः अनुदानित अथवा नाममात्र वेतन घेणाऱया, आतापर्यंत पगारच न मिळालेल्या शिक्षकांबाबत हा निर्णय घेताना सरकारने विचारच केलेला नाही. अतिरिक्त पोशाखाचा खर्च या शिक्षकांना डोईजड होणार नाही का? याची सरकारला जाणीव नसल्याचा आरोप अभ्यंकर यांनी केला आहे.






























































