
नीलेश कुलकर्णी
कर्नाटकच्या निवडणुकीने दिल्लीतील सत्ताधीशांचे ‘तारे जमी पर’ आणले आहेत. ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय पोपटांना भीक न घालता सुमारे पन्नासाहून अधिक तालेवार भाजप पुढाऱ्यांनी पक्षाला ‘जय श्रीराम’ केला आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री सावदी यांनी तर भाजपला अलविदा करत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. साम, दाम, दंड आणि भेदाचे चालवलेले राजकारण कर्नाटकात उताणे पडताना दिसत आहे. कर्नाटकात भाजपमध्ये बंडखोरीचे पेव फुटले आहे, पक्षशिस्तीची कल्हई निघाली आहे.
लोकशाहीत लोकभावना तितक्याच महत्त्वाच्या असतात हा धडा कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला मिळाला आहे. येडियुरप्पांसारख्या मातब्बर नेत्याचे पंख छाटून बसवराज बोम्मईंसारखा ‘डमी मुख्यमंत्री’ कर्नाटकच्या डोक्यावर बसवणे भाजपला चांगलेच महागात पडले आहे. कर्नाटक भाजपच्या हातून जाईल असेच सध्याचे चित्र आहे. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दिल्लीकरांच्या दंडेलशाहीला भाजपचे जुनेजाणते नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि मंडळींनी धूप घातला नाही हे महत्त्वाचे. मोदी-शहा यांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत कोणाची नव्हती. ती कर्नाटकातल्या पुढाऱ्यांनी सामूहिकपणे दाखवली आहे. कर्नाटकात कॉंग्रेस सहज जिंकेल असे सध्याचे चित्र आहे. त्या अर्थाने कर्नाटकची निवडणूक देशाच्या राजकारणासाठी टर्निंग पॉइंट ठरेल. कर्नाटकातले निर्भीडतेचे वारे पुढे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढसह इतर राज्यांत पसरले तर 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकणे भाजपसाठी कठीण जाईल.
कर्नाटकच्या निवडणुकीत अनेक प्रकारची नाटके घडताना दिसत आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीतून भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष यांचे खासमखास तेजस्वी सूर्या यांचेच नाव गायब झाल्याने कर्नाटक भाजपात ‘ऑल इज वेल’ नसल्याचा मेसेज गेला आहे. संतोष व येडियुरप्पा यांच्यातील संघर्षाने कर्नाटकातील भाजप धराशायी पडला आहे. अर्थात कर्नाटक हातून जाणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असतानाही मोदी-शहा हे ज्या पद्धतीने मेहनत घेत आहेत, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच! कर्नाटक राखण्यासाठी ही दिल्लीकर जोडी वाट्टेल ते फंडे आजमावत आहे. काही कानडी नटनट्यांना भाजपचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरवले आहे. जगदीश शेट्टर यांचे ‘मन’ वळविण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र, ते निष्फळ ठरले. वास्तविक, येडियुरप्पांनी बंड केल्यानंतर कर्नाटकातला संपूर्ण लिंगायत समाज शेट्टर यांच्या पाठीशी एकवटला होता. त्यावेळी तुम्ही नेतृत्व करा, बंड करा, असे समाजाने सुचवूनही शेट्टर यांनी पक्षनिष्ठा महत्त्वाची मानली होती. त्याची जबर किंमत त्यांना तिकीट गमावण्याच्या रूपाने चुकवावी लागली आहे. शेट्टर यांच्या बंडाने अगोदरच गर्तेत सापडलेल्या भाजपची अवस्था आणखी दयनीय होईल या भीतीने दिल्लीतून शेट्टर यांच्या नाकदुऱया काढण्यासाठी फोन गेले. मात्र शेट्टर यांनी कोणालाही धूप न घालता काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. गुजरात मॉडेल प्रत्येक ठिकाणी लागू होतेच असे नाही हा धडा कर्नाटकने दिल्लीतील गुजरात मॉडेलच्या ‘जनकां’ना दिला आहे. आता सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यात ‘समेट’ घडवून जनतेने हातातोंडाशी आणलेली सत्ता कॉंग्रेसने सत्कारणी लावावी इतकेच. ऐन वेळी फंदफितुरी व गटातटांचे राजकारण करून सत्ता गमावू नये.
























































