मानाची स्पर्धा -‘आयएनटी’ची कै. प्रवीण जोशी आंतर महाविद्यालयीन एकांकिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकांकिका वर्तुळातील सर्वात मानाची स्पर्धा म्हणजे ‘आयएनटी’ची कै. प्रवीण जोशी आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा. सामजिक विषयावर आजची तरुणाई कशी व्यक्त होत आहे  हे ‘आयएनटी’मध्ये सादर होणाऱया एकांकिकांमुळे पाहायला मिळते. यंदाची या स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच यशवंतराव चव्हाण सेंटर नरीमन पॉइंट येथे पार पडली. यातून 10 एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड होईल. त्यांचं सादरीकरण 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दरवर्षी होणाऱया या स्पर्धेत गेल्या दोन वर्षांपासून बदल करण्यात आला आहे. पूर्वी प्राथमिक फेरी, पूर्व प्राथमिक आणि अंतिम फेरी व्हायची. सध्याच्या घाईगडबडीच्या काळात नाटय़ प्रक्रिया हरवली जाऊ नये हा उद्देश या एकांकिकांमधून साध्य होताना दिसतो, असे आयएनटीचे रामचंद्र वरक सांगतात. या स्पर्धेतून मिळणाऱया पारितोषिकाविषयी त्यांचे मत आहे की, कोणत्याही व्यावसायिक उद्देशाने या एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येत नाहीत. त्यामुळे या स्पर्धेतून मिळालेली पारितोषिके आणि इतर स्पर्धांतून मिळालेल्या पारितोषिकांमध्ये फरक जाणवतो. सगळ्यात कमी पारितोषिकं देऊनही या स्पर्धेकडे स्पर्धकांचा ओढा असतो. कारण ही ‘नाटय़ चळवळ’ आहे. परीक्षक आणि दिग्दर्शकांच्या चर्चेतून या एकांकिका बहरत जातात.

दरवर्षी नव्या संहिता 

यंदाच्या फेरीचं वैशिष्टय़ हे की, गेल्या 45 वर्षांपासून नवीन संहिता या स्पर्धेसाठी लिहिली जाते. यामध्ये मुंबईतील अनेक महाविद्यालयांचा सहभाग असतो. त्यामुळे दरवर्षी नव्या संहिता लिहिल्या जातात. रुईया, रूपारेल, डहाणूकर, साठये, उरण येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, विरार येथील विवा महाविद्यालय, वझे-केळकर, बीएमएम महिला विद्यापीठ अशा फक्त मुंबईतील काही महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे.

सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब

प्रवीण जोशी हे गुजराती रंगभूमीवरचे दिग्गज अभिनेते होते. त्यांनी ‘ती फुलराणी’ या सुप्रसिद्ध नाटकाचे दिग्दर्शन केले होते. आयएनटीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. म्हणून त्यांच्या नावाने ‘प्रवीण जोशी’ एकांकिका सुरू करण्यात आली. या स्पर्धेसाठी दरवर्षी किमान 50 संहिता लिहिल्या जातात. या सगळ्या संहिता रंगमंचावर सादर होतात. विशेष म्हणजे चालू घडामोडींचं प्रतिबिंब या एकांकिकांमधून डोकावतं. ज्येष्ठ निर्माते, परीक्षक यांची एकांकिका स्पर्धेला आवर्जून उपस्थिती असते.