एकात्मिक पूर व्यवस्थापन प्रणालीमुळे महापूर टाळणे शक्य, कृष्णा खेरे महामंडळाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीव्र पावसाच्या काळात धरणे, नद्या आणि नद्यांमधील पाण्याचा विसर्ग कसा असावा, याबाबत एकात्मिक पूर व्यवस्थापन प्रणाली राबवली, तर महापूर टाळणे शक्य होईल, असे मत या विषयावर पीएच.डी. केलेले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सांगली व कोल्हापूर जिह्यातील महापुरासंदर्भात त्यांनी पीएच.डी. दरम्यान केलेला अभ्यास व काढलेले निष्कर्ष या संदर्भात ते बोलत होते. हेमंत धुमाळ यांनी महापुरावर उपाययोजना केलेल्या वडनेरे समितीबरोबरीही काम केले असून, समितीच्या तीन शिफारशींवर सध्या काम सुरू आहे. महाराष्ट्र शासनामार्फत धुमाळ यांनी जपान येथे ‘पूर व्यवस्थापन’ विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेचे प्रतिनिधित्व केले आहे.

धुमाळ म्हणाले, महापूर येण्यापूर्वी 48 ते 72 तास त्याचा अंदाज देणारे मॉडेल तयार करण्यात आले आहे. अलमट्टी आणि हिप्परगी धरणांचा 2005 पासून आत्तापर्यंतच्या महापुरांशी काही संबंध नाही. धरणातील पाणी सोडल्यामुळे महापूर येतो, ही लोकभावना चुकीची आहे. ही धरणे नसती तर 200 ते 250 टीएमसी पाणी शहरात घुसून फार गंभीर प्रश्न निर्माण झाले असते. यापुढे कोयना, वारणा, राधानगरी अशा 22 धरणांचे तसेच नदीतून येणारे पाणी सोडताना एकात्मिक परिचलन पद्धती कशी अवलंबावी, याबाबत एक सॉफ्टवेअर तयार केले असून, ते वेळोवेळी धरणांमध्ये आणि नदीत किती पाणी आहे, याचा प्रत्येक तासाचा विचार करून कोणत्या नदी आणि धरणातून किती विसर्ग करायचा, हे ठरवून त्याची माहिती अलमट्टी आणि हिप्परगीलाही दिली जाईल. त्यातून किती पाणी सोडले जाईल, याची माहिती मिळेल. तेथून पुढे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासाठी कर्नाटकचे सहकार्य घेता येऊ शकेल. हा प्रस्ताव सध्या शासनपातळीवर आहे.

आपण मांडलेली अभ्यासातील अनेक मते ही वडनेरे समितीच्या शिफारशीत असून, शासनाने त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. एकात्मिक परिचालन सुरू झाले तर तो हिंदुस्थानातील पहिला प्रयोग असेल. त्यादृष्टीने सॉफ्टवेअर तयार केल्याची माहिती त्यांनी दिली. मुक्त पाणी मोजण्यासाठी 2019च्या महापुरानंतर 11 हजार 500 चौरस किलोमीटर मुक्तसंचार क्षेत्रातही संततधार पाऊस झाल्याने तेथे पडलेला पाऊस मोजण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचेही ते म्हणाले.

नदीतील वळणे सरळ केल्यास पाणीपातळी कमी होते

 नदीतील वळणे सरळ केल्यास त्याचा पाणीपातळी कमी करण्यासाठी फायदा होतो. कृष्णा नदीची वळणे दूर केल्यास आयर्विन ते कृष्णा बंधारा अर्धा मीटर, वारणा संगम येथे 7.5 मीटर, मिरज ते अर्जुनवाड येथे सव्वा मीटर इतकी पाणीपातळी कमी राहील. शिवाय दोन पुलांमध्ये 900 मीटर ते दीड हजार मीटर इतके अंतर असेल. त्यामुळे पाणी अडण्याचा धोका निर्माण होणार नाही. मात्र, त्यासाठी काही तांत्रिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.