व्याजदर घटणार, हप्ता कमी होणार रेपो रेट कमी झाल्याने चार बँकांकडून व्याजदरात कपात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 5 डिसेंबरच्या पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो रेट 0.25 बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत. त्यामुळे सध्या रेपो रेट 5.25 टक्के आहे.  रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर अनेक बँकांनी  कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. व्याजदरात कपात झाल्याने आता ईएमआयदेखील कमी होणार आहे.  बँक ऑफ बडोदा ते बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांनी होम लोनवरील व्याजदरात कपात केली आहे.

2025 मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये जवळपास 1.25 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. रेपो रेट सध्या 5.25 आहे. रेपो रेटमध्ये सर्वात पहिली कपात फेब्रुवारी 2025 मध्ये झाली होती. त्या वेळी रेपो रेट 6.50 वरून 6.25 टक्के झाला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा 25 बेसिस पॉइंट्सने कपात करण्यात आली होती. त्यानंतर सलग तिसऱयांदा जून महिन्यात 50 टक्के बेसिस पॉइंट्सने कपात केली. यानंतर आता पुन्हा बेसिस पॉइंट्समध्ये कपात झाली आहे. त्यामुळे या वर्षी सर्वाधिक कपात झाल्याने कर्जदारांना मात्र दिलासा मिळाला आहे.

या बँकांनी व्याजदरात केली कपात

पंजाब नॅशनल बँकेने  त्यांचा रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) 8.35 टक्क्यांवरून  8.10 टक्केपर्यंत कमी केला आहे.  नवीन व्याजदर 6 डिसेंबर 2025 पासून लागू आहेत.

बँक ऑफ इंडियाने आरबीएलआरमध्ये 25 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. त्यामुळे व्याजदर 8.35 टक्क्यांवरून 8.10 टक्के झाले आहे.

इंडियन बँकेने आरबीएलआरमध्ये  कपात केली आहे. त्यामुळे व्याज 8.20 टक्क्यांवरून 7.59 टक्के झाले आहे. याचसोबत एमसीएलआरमध्येही 5 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे.

बँक ऑफ बडोदाने बेस्ड लेंडिंग रेट्समध्ये 25 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. त्यामुळे हे दर 8.15 वरून 7.90 झाला आहे.