International Kissing Day – या अभिनेत्रीने दिला होता बॉलिवूडचा पहिला किसिंग सीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोट्यवधींची उलाढाल असलेलं बॉलिवूड अर्थात हिंदी चित्रपटसृष्टी ही 100हून अधिक वर्षांची आहे. काळाच्या ओघात या चित्रपटांच्या परिभाषा बदलल्या आहेत. त्यासोबत त्याची मांडणी देखील बदलली. आजच्या चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणारे बोल्ड सीन बऱ्याचदा चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरतात. पण, सध्याच्या चित्रपटांमध्ये सहजमान्य होणाऱ्या किसिंग सीनची सुरुवात खूप वर्षांपूर्वीच झाली होती.

आज आंतरराष्ट्रीय किसिंग डेच्या निमित्ताने आपण बॉलिवूडच्या याच पहिल्या किसिंग सीनविषयी जाणून घेणार आहोत. हा सीन सुमारे 88 वर्षांआधी एका चित्रपटासाठी चित्रित करण्यात आला होता. ते साल होतं 1933 आणि चित्रपटाचं नाव होतं कर्मा.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते देविका राणी आणि हिमांशु राय. तब्बल चार मिनिटं लांब इतका मोठा हा किसिंग सीन देविका आणि हिमांशू यांच्यात चित्रित झाला होता. त्या काळात इतका बोल्ड सीन चित्रित करणं आणि तो पडद्यावर दाखवणं सोपं नव्हतं.

resize-16255647411807028295devikaranikiss

खरंतर त्या दृश्यात तथाकथित बोल्ड असं काहीच नव्हतं. चित्रपटाचा नायक बेशुद्ध पडतो आणि नायिका त्याला जागवण्यासाठी त्याचं दीर्घ चुंबन घेते, असं ते दृश्य होतं. अर्थात हिमांशु आणि देविका हे वास्तव जीवनातही नवराबायको होते.

पण, या सीनमुळे तेव्हा चांगलाच वाद निर्माण झाला होता. मात्र, देविका राणी यांचं नाव चित्रपट इतिहासात अजरामर झालं. बॉलिवूडपटातला पहिला किसिंग सीन चित्रित करण्याचा विक्रम जसा त्यांच्या नावे आहे, तसेच अनेक विक्रम त्यांच्या नावे आहेत.

30 मार्च 1908 रोजी जन्मलेल्या देविका यांनी 1930 च्या आसपास चित्रपटांमध्ये भूमिका करण्यात सुरुवात केली. जवळपास दहा वर्षांचं करिअर केलेल्या देविका राणी यांना फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा म्हणून ओळखलं जातं. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या मानकरी होत्या. 1958 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.