
प्रवाशांना घेऊन जाणारी बोट शुक्रवारी समुद्रात उलटल्याने 14 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. बोटीत एकूण 18 प्रवासी होते. यापैकी दोन जण पोहत किनाऱ्यावर आल्याने बचावले. वाचलेल्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनंतर ही दुर्घटना उघडकीस आली. बेपत्ता दोघांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
पश्चिम तुर्की प्रांतातील मुगला किनाऱ्यावर बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन जाणारी रबर बोट उलटली. स्थानिक राज्यपाल कार्यालयाने निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली. निवेदनानुसार, एक अफगाण नागरिक अपघातातून बचावला आणि पहाटे 1 वाजता पोहत किनाऱ्यावर पोहचला. त्यानंतर या नागरिकाने अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.
बचाव कार्यादरम्यान आणखी एक प्रवासी पोहताना सापडला असून त्याला वाचवण्यात आले आहे. समुद्रातून 14 स्थलांतरितांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चार तटरक्षक दलाच्या बोटी, एक विशेष डायव्हिंग टीम आणि एक हेलिकॉप्टर बेपत्ता स्थलांतरितांना शोध घेत आहेत. युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणारे बेकायदेशीर स्थलांतरित एजियन समुद्रातून प्रवास करतात.


























































