
दुबईच्या अल बदा भागातील निवासी इमारतींवर क्षेपणास्त्राचे अवशेष कोसळल्याने दोन हिंदुस्थानी नागरिकांसह चौघे जण जखमी झाले. जखमी झालेल्यांमध्ये एका बांगलादेशी आणि एका श्रीलंकन नागरिकाचा समावेश आहे. या घटनेत मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. आखाती देशांतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. इराण आखाती प्रदेशात सक्रियपणे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, शहराच्या दक्षिण भागात हवेतच क्षेपणास्त्र नष्ट केल्यानंतर त्याचे अवशेष निवासी इमारती आणि घरांवर पडले. यात एका घरालाही आग लागली. अग्नीशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. घरांवर हे अवशेष पडल्याने मालमत्तेचे नुकसान झाले असून नागरिकही जखमी झाले. आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया आणि जॉर्डन या देशांनी गेल्या काही दिवसांत इराणकडून आलेले अनेक हल्ले परतवून लावले आहेत. इराणने हे हल्ले आत्मसंरक्षणासाठी असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.



























































