उड्डाण घेताच विमान कोसळून आगीच्या भक्ष्यस्थानी, दोघांचा होरपळून मृत्यू; दोन जण गंभीर भाजले

उड्डाण घेताच खासगी विमान कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. या दुर्घटनेत विमानातील दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. व्हेनेझुएलातील ताचिरामध्ये पॅरामिलो विमानतळावर ही घटना घडली. आपत्कालीन सेवा आणि अग्नीशमन दलाने त्वरीत घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पॅरामिलो विमानतळावर स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.52 वाजता ही दुर्घटना घडली. टेकऑफ करताच विमान अनियंत्रित झाले आणि कोसळले. धावपट्टीवर कोसळताच विमानाने पेट घेतला. अपघाताची चौकशी करण्यासाठी जुंता इन्व्हेस्टिगाडोरा अ‍ॅक्सिडेंटस डे एव्हियान्सिस सिव्हिलचे एक पथक सक्रिय करण्यात आल्याचे व्हेनेझुएलाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सांगितले.

अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. टायर फुटणे किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघाताचा तपास सुरू आहे.