
अमेरिकेतील ऱ्होड आयलंड राज्यातील प्रोव्हिडन्स येथील ब्राउन विद्यापीठात गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. गोळीबारानंतर संशयित आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत ब्राऊन विद्यापीठ परिसरात येणे टाळा, असे आवाहने पोलिसांनी केले आहे.
विद्यापीठात परीक्षा सुरू असतानाच शनिवारी दुपारी 4 वाजून 20 मिनिटांनी ही घटना घडली. एका हल्लेखोराने विद्यापीठ परिसरात अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. काळ्या रंगाच्या कपडे घालून आलेल्या एका तरुणाने इंजिनिअरिंग विभागाच्या इमारतीत घुसून गोळीबार केला. हा गोळीबार कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप समजू शकले नाही. हल्लेखोर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गोळीबाराच्या घटनेनंतर विद्यापीठाने अलर्ट जारी करत विद्यार्थ्यांना क्लासरुमचे दरवाजे बंद करण्याचा, लपून राहण्याचा आणि मोबाईल सायलेंट करण्याचा सल्ला देण्यात आला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



























































