
कोल्हापूर, दि. 16 (प्रतिनिधी) – सिंधुदुर्ग, कर्नाटक तसेच गोव्याच्या भूभागातील ‘संदूरपट्टा’ म्हणून ओळखल्या जाणाऱया विस्तीर्ण प्रदेशात सोने व अन्य मौल्यवान धातू मिळणे शक्य आहे. पण या संपूर्ण भूभागाचे सर्वेक्षण न करताच खनिजांची निर्यात होत आहे. या परिसरातील संशोधनासंदर्भात राष्ट्रपतींपासून सर्व नेत्यांचे दरवाजे ठोठावूनही देशातील सोने व प्लॅटिनम वर्गातील मौल्यवान धातूंची निर्यात चीन व जपानसारख्या देशांना होत आहे. मौल्यवान खनिजांचे अनेक डोंगर भुईसपाट झाले तरी यामध्ये दुर्लक्ष होत असल्याने, यामागे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचाराची साखळी असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा खळबळजनक संशय ऍड. नंदकुमार पवार, आर. एच. हजारे तसेच ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी केला आहे.
चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिह्यांत सोन्याच्या खाणी असल्याचे तज्ञांचे सांगणे असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे सन 1988 पासून आम्ही केलेल्या दाव्याला उजाळा मिळाला आहे. भूगर्भातील मौल्यवान धातू हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीतील असल्याचे सांगून, नंदकुमार पवार म्हणाले, सिंधुदुर्गातून लोहखनिज म्हणून उत्खनन व निर्यात होणाऱया खनिजात मौल्यवान धातू असण्याची शंका सन 1970च्या दशकात प्रथम कोकणनिवासी व भूगर्भशास्त्र्ााचे अभ्यासक डॉ. एम. के. प्रभू यांना आली होती. पण ते कॅनडाला गेल्याने हा विषय मागे पडला. सन 1980च्या दशकात राज्य शासनाच्या खनिकर्म विभागासाठी खनिजांची तपासणी करण्याचे काम करताना रामसिंग हजारे यांनी याचा वैयक्तिक पातळीवर शोध घेतला होता. यावेळी सोने व प्लॅटिनम वर्गातील सहा मौल्यवान धातू या खनिजात मोठय़ा प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले. वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणल्यानंतर हजारेंवर सक्तीने सेवानिवृत्ती लादण्यात आली, असा आरोप पवार यांनी केला.
कोल्हापूर जिल्हा शासकीय कर्मचारी संघटना तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे तत्कालीन अध्यक्ष शिवाजी देसाई यानीही याप्रकरणी लक्ष घातले. प्रभाकर तांबट, पत्रकार उदय कुलकर्णी यांनीही याला वाचा फोडण्याचे काम केले. याबाबत विधान परिषदेत चर्चाही झाली, पण शासकीय पातळीवरून काही घडले नाही. हजारे यांच्या पत्रव्यवहारामुळे काही काळासाठी केंद्र सरकारने या खजिनाची निर्यात रोखली होती.
दरम्यान, हजारे व कुलकर्णी यांच्या पाठपुराव्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू एम. जी. ताकवले यांनी स्वतः सिंधुदुर्ग जिह्यातील खनिजाचे नमुने घेतले. विद्यापीठाचे भूगर्भशास्त्र्ा विभागप्रमुख डॉ. आर. आर. पाटील यांच्याकडून हट्टी गोल्ड माईन्सच्या प्रयोगशाळेत नमुने पाठवले. या तपासणीचे निष्कर्ष हजारे यांच्या आधीच्या निष्कर्षांप्रमाणेच मिळाले. डॉ. ताकवले यांनी याबाबतचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सादर केला. दुसरीकडे गोवा विद्यापीठातील डॉ. नंदकुमार कामत यांनी गोव्यातून निर्यात होत असलेल्या खनिजातदेखील सोने असल्याचा दावा केला. पण त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला, असे ऍड. पवार यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी लोह खनिजाच्या नावावर मौल्यवान धातूंच्या निर्यातीतून होणारी देशाची लूट थांबवावी. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकच्या काही भागामध्ये सोन्याबरोबरच प्लॅटिनम, ऑस्मियम व पॅलेडियम यांसारखे मौल्यवान धातू आढळत असल्याने ‘संदूरपट्टा’ म्हणून ओळखल्या जाणाऱया या तीनही राज्यांतील भूभागाचे सर्वेक्षण होण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र शासनाने तत्काळ समिती नेमावी, अशी मागणी पवार यांनी केली.



























































