
सध्याच्या जमान्यात इंटरनेट जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. आपलं जीवन सहज आणि मनोरंजक बनवण्याचे काम इंटरनेट करत आहे. त्यामुळेच दिवसागणिक त्याचा वापर करणाऱयांची संख्या झपाटय़ाने वाढत आहेत.
जगातील 60 टक्के लोक इंटरनेट वापरतात. प्रत्येक सेकंदाला 14 जण इंटरनेटवर जोडले जातात. एवढेच नव्हे तर आपण दिवसाला सरासरी सात तास इंटरनेटवर घालवतो, अशी अचंबित करणारी माहिती समोर आली आहे. कोरोना काळात तर नेट म्हणजे लाईफलाईनच बनले आहे.
29 ऑक्टोबर 1969 रोजी इंटरनेटच्या वापराला सुरुवात झाली. 2005 साली पहिल्यांदा इंटरनेट दिवस साजरा झाला. त्यानंतर 2016 पासून 29 ऑक्टोबर रोजी जगभर इंटरनेट दिवस साजरा होऊ लागला.
यानिमित्त करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आलंय की, जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे. त्यापैकी 466 कोटी म्हणजे 60 टक्के लोक इंटरनेटशी जोडले गेले आहेत. त्यातील 70 कोटी युजर्स हिंदुस्थानात आहेत.
लॉकडाऊनच्या काळात इंटरनेट युजर्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. युजर्सच्या ऑनलाईन वेळेतसुद्धा लक्षणीय वाढ नोंदवली गेली. घरात बसून अभ्यास, ऑफिसचे काम, मनोरंजन आणि व्यवसायासाठी इंटरनेटचा वापर होत आहे. परिणामी एका वर्षात इंटरनेट युजर्स 32 कोटी वाढले आहेत. हिंदुस्थानात वर्षभरात 23 टक्के युजर्स वाढले आहेत. युजर्सचे सरासरी वय 16 ते 64 वर्षे एवढे आहे. 91 टक्के लोकांच्या मोबाईलवर इंटरनेट आहे, तर उर्वरित लोक कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर इंटरनेट चालवतात.
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 18 कोटी नवे युजर्स इंटरनेटवर आले. म्हणजे दिवसाला सुमारे 20 लाख नवे युजर्स असे हे प्रमाण आहे. इंटरनेट युजर्सचा स्क्रीन टाईम एक तासाने वाढला आहे. दिवसाला लोक 7 तास इंटरनेटवर घालवतात.
आपण दिवसाला सरासरी दोन तास 29 मिनिटे एवढा वेळ सोशल मीडियावर घालवतो. ऑक्टोबर 2019 ते ऑक्टोबर 2020 पर्यंत 45 लाखांहून अधिक युजर्स सोशल मीडियावर ऑक्टिव्ह आहेत. प्रत्येक वर्षी 12 टक्के वाढ नोंदवण्यात आली.
























































