
जगभरातील युजर्सला गेली 25 वर्षे अविरत सेवा देणारे इंटरनेट एक्सप्लोरर आता बंद करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने केला आहे. 15 जून 2022पासून विंडोज-10वरील इंटरनेट एक्सप्लोररची सेवा थांबेल आणि त्याची जागा मायक्रोसॉफ्ट एज घेणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून युजर्सनी इंटरनेट एक्सप्लोररचा वापर बंद करावा, यासाठी मायक्रोसॉफ्टकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याऐवजी मायक्रोसॉफ्ट एज वापरावे यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तसेच जुन्या वेबसाईटची जागा हे क्रोमिअम आधारित ब्राऊझर घेणार असून त्यासंबंधी अनेक व्यवहारही त्याने अॅडॉप्ट केले आहेत. इंटरनेट एक्सप्लोरर मोड ही जुनी ऑक्टिव्ह एक्स कंट्रोल साईट असून त्याचा उपयोग अजूनही अनेक व्यवहारांमध्ये होतो.
गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्टने आपल्या वेब अॅपचा इंटरनेट एक्सप्लोरर सपोर्ट काढून घेतला होता. त्यानंतर या वर्षाखेरपर्यंत मायक्रोसॉफ्टच्या 365 सेवांचा इंटरनेट एक्सप्लोररचा सपोर्ट काढून घेण्यात येणार आहे. त्यानंतर आता मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस, वनड्राइव्ह, आउटलूक आणि इतर सेवांचा सपोर्ट 17 ऑगस्टनंतर बंद करण्यात येणार आहे.
























































