गर्दीतला माणूस

1985

>> मिलिंद शिंदे

भीमराव मुडे. रुद्रम, आता नवीन येणारे अग्निहोत्रचे दिग्दर्शक. हा साधा माणूस अजूनही प्रसिद्धी झोतात आलेलाच नाही. पण छोटा – मोठा पडदा त्याच्या कामाने लखलखून जातो…

असं कसं परीक्षा घ्या त्याची’. शिरीष जोशी (‘रुद्रम’ मालिकेचे लेखक) यांनी सूचना केली आणि परीक्षेला सुरुवात झाली. मग तू हे कसं करशील? हा एकटा तू कसा कन्सिव्ह करशील? याचा काय अर्थ आहे? यातून लेखकाला काय सांगायचंय? इ. प्रश्नांची उत्तरे त्या मुलाने दिली.

‘तोंडी परीक्षेत तर हा पास झाला’ शिरीष जोशी आश्वस्त स्वरात. त्या मुलाला बरं वाटलं, पण परीक्षा संपली नव्हती. काहीतरी प्रॅक्टिकली शूटिंग केले पाहिजे. मग काही भाग चित्रित करू सगळय़ांनी पाहिला व संबंधित वाहिनीलाही पाठवला. सगळय़ांना त्या मुलाने चित्रित केलेले फुटेज आवडले.
आणि तू ही मालिका दिग्दर्शित करतोय असं त्या मुलाला सांगण्यात आले. तात्पर्य – भीमराव मुडे ‘रुद्रम’ मालिकेचा दिग्दर्शक झाला. घरोघरी जाऊन पोहोचला, सृजन वर्गात चिकित्सेचा विषय बनला. ‘रुद्रम’ या मालिकेनं काय प्रकारचं यश मिळवलंय हे आपण सगळे जाणतोच. त्याच्यामागे जितके शिरीष जोशी होते तितकेच भीमरावाचेही कष्ट आणि कौशल्य होतं. ‘रुद्रम’चंही नाव झालं, सोबत भीमरावचंही.

वडील गिरणी कमगार, परिस्थिती ठीकठाक. भीमरावचं शिक्षण महर्षी दयानंद महाविद्यालयात सुरू. तिथल्या नाटय़वर्तुळाने त्याला आकर्षित केलं आणि आपसुकच पाय तालीम हॉलकडे वळले. ते आवडू लागले. आणि संतोष पवार दिग्दर्शित ‘पहिल्या बापाचा पहिला मुलगा’ या एकांकिकेच्या गर्दीतून भीमरावचा प्रवास सुरू झाला. गर्दी असली तरी त्या वातावरणाची झिंग मोठी… संतोष पवार आणि प्रा. गीता मांजरेकर यांनी त्या वेळचे मोलाचं मार्गदर्शन लाभलं हे भीम आस्थेने कबूल करतो. गर्दीतून छोटी भूमिका, मग त्याहून मोठी, मग महत्त्वाच्या भूमिकेत स्थान मिळू लागलं. आणि भीमचं मन तालमीत त्या वातावरणात संस्कारीत होऊ लागली. पण आपल्यावर एक मोठी जबाबदारी पडणार आहे हे त्याच्या ध्यानीही नव्हते. कारण जो दिग्दर्शक नाटक बसवून (खरं तर उभं करून) होता तो काही कारणाने असमर्थ ठरला आणि दिग्दर्शक म्हणून जबाबदारी भीमवर पडली. त्या एकांकिकेचं नाव ‘मैताला गर्दी.’

गर्दीतून आलेला भीम सगळय़ांवर अंकुश ठेवणारा म्होरक्या बनला, दिग्दर्शक झाला.
संतोष कणेकर याने भीमरावमध्ये असलेलं हुनर चोख हेरलं आणि असाच प्रवास पुढे करत राहण्याचं प्रोत्साहन तर दिलंच दिलं, पण राजेश देशपांडेकडे जाण्याची शिफारसही केली. राजेश देशपांडे तेव्हा ‘गंगूबाई नॉनमॅट्रिक’ ही मालिका करीत होता. भीम तिकडे दाखल झाला. राजेशच्या हाताखाली दिग्दर्शनाचे धडे गिरवू लागला. राजेश देशपांडे यांच्याकडे खूप शिकता आलं हे भीमराव नम्रपणे कबूल करतो. सिने-नाटय़ क्षेत्रात काम करता करता त्याचं शिक्षणही सुरू होतंच. रुपारेल महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतलेला भीमराव नाटक-सिनेमात आता रुळू लागला होता. त्याच्यातला अभिनेता जिवंत असला तरी त्याने दिग्दर्शनाच्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला आणि त्या वाटेने निघाला.

कालांतराने शॉर्ट फिल्म ही नवचळवळ खुणावू लागली. मित्र संचित वर्तकने साथ दिली. साधारण 60,000 च्या अंदाजपत्रकात केलेल्या ‘In The Water’ या धरणग्रस्तांवरच्या लघु चित्रपटानं सुमारे 2,50,000 चा ऐवज (महसूल) मिळवून दिला. आणि आपण योग्य वाटेवर आहोत याची पेचही मिळाली.
सदर लघु चित्रपटाला अनेक मोठमोठय़ा लघु चित्रपट महोत्सवांत अनेक पुरस्कार मिळाले. त्यातून रक्कम आली ती रक्कम आणखी मोठी करण्याची योजना सुचवू लागली.

संचित वर्तक हा सवंगडी सदैव मदतीला, दोघांच्या डोक्यातील कल्पनेनं आकार घेतला आणि रुपेरी पडद्यावर दिग्दर्शक भीमराव मुंडे – संचित वर्तक असा श्रेयनामासहीत ‘डावपेच’ नावाचा सिनेमा झळकला. सिनेमाची चर्चा झाली. या सिनेमात चित्रपटसृष्टीतील नामांकित मंडळी होती. सिनेमा उत्तम झाला. हा सिनेमा सहदिग्दर्शित करणाऱया भीमरावचं वय तेव्हा केवळ पंचवीस होतं.
‘बार्ज’ या सिनेमानं भीमला नाव दिलं आणि समीक्षकवर्गाने कामाची दखलही मिळवून दिली आणि त्या वर्षीच ‘मामी’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाची हजेरी लागली. चर्चा झाली. वेगळा सिनेमा म्हणून दखल घेण्यात आली. सिनेमाच्या आघाडीवर लढताना दुसरीकडे विविध विषयांवरील मालिकांचे प्रयोगही सुरू होते. गंगूबाई नॉनमॅट्रिक, पुणेरी मिसळ, दुहेरी लक्ष्य ही अतिशय गाजलेली मालिका अफाट प्रेक्षकवर्ग असलेल्या या मालिकेने भीमरावचं नाव अधिक ठसठशीत कोरलं आणि नव्या दमाचा, वेगळा अप्रोच असलेला दिग्दर्शक म्हणून लोक नावाजू लागले. नंतर आलेल्या ‘बापमाणूस’ या मालिकेनं भीमला आणखी मोठय़ा उंचीवर नेऊन ठेवलं.

‘निर्माता नफ्यात राहिला पाहिजे’ या ब्रिदावर भीमराव मुडेची वाटचाल सुरू आहे. त्याच्या लेखी निर्मात्याचं महत्त्व खूप आहे. त्याच्यामुळेच आपण सगळे एकत्र आलो आहोत. त्याचा परतावा त्याला आपण द्यायला हवा आणि दिग्दर्शक म्हणून त्यात त्याची मोठी जबाबदारीही स्वीकारतो.
आता भीमराव ‘अग्निहोत्र’ या मालिकेच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. यापूर्वीही ‘अग्निहोत्र’ नावाची मालिका होती. आणि ती अतिशय गाजली होती. त्याची निर्मिती इंडियन मॅजिक आय या संस्थेने केली होती. त्याचे दिग्दर्शक होते श्रीराम गोडबोले आणि सतीश राजवाडे. आताही निर्मिती संस्था तीच आहे पण दिग्दर्शक आहे भीमराव मुडे. मोठी जबाबदारी पुढे नेण्याचा यज्ञ… अग्निहोत्र. विशेष म्हणजे सतीश राजवाडे यानेच भीमचं नाव पुढे केले. कारण ‘रुद्रम’ या मालिकेत सतीश राजवाडे स्वतः काम करीत होता. त्याने भीमचं काम पाहिलं होतं आणि निर्मिती संस्थेकडे भीमरावच्या नावाची शिफारस केली. या सतीश राजवाडेच्या या kind gesture बद्दल भीम त्याचा खूप ऋणी आहे असं म्हणताना त्यांच्या म्हणण्यातली आर्तता त्या बोलण्यातून हलकेच झिरपते.
आई, भाऊ आणि पत्नी यांच्या प्रोत्साहनामुळे, सहकार्यामुळेच आपण इथपर्यंतचा प्रवास केला अशीही ग्वाही भीम देतो, पण त्यांची एक प्रेमळ तक्रार आहे असंही नमूद करतो. काय तर त्याचं असं म्हणणे आहे की ‘लोक तुला ओळखत कसे नाहीत. बाकी लोकांना कसं ओळखतात. ग्लॅमर आहे तसं गर्दीतल्या लोकांनी तुला ओळखलं पाहिजे. ‘ग्लॅमर पाहिजे’ पडद्यावर दिसतात तेच कलावंत असतात असा अजूनही सायकीक समज आहे. पण भीमराव तुम्हाला सांगतो एक दिवस येईल आणि तो फार लांब नाही. गर्दी (मॉब) मधून आलेल्या भीमराव मुडेला गर्दीतले लोक नाहीत तर गर्दीतला प्रत्येक माणूस ओळखील. आणि तुमच्या आईला ‘तुम्ही भीमराव मुडेची आई ना’ असं ओळखतील तेव्हा तुमच्या आईच्या डोळय़ांत त्या ग्लॅमरलाही लाजवेल अशी चमक असेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या