प्रॉमिसिंग – एकांकिका, मालिका आणि बरेच काही!

>> गणेश आचवल

काही व्यक्ती या नकारात्मक भूमिकेमुळे पटकन लक्षात राहतात. सध्या सोनी मराठीवरील ‘तुमची मुलगी काय करते’मध्ये ‘‘विश’ ही नकारात्मक भूमिका करणाऱ्या युवा कलाकाराचे नाव आहे तेजस राऊत… एक प्रॉमिसिंग चेहरा.

तेजस राऊत मूळचा डोंबिवलीकर. सिस्टर निवेदिता हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्याने ‘वझे केळकर कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. शाळेपासूनच त्याला नकला करायची आवड होती. कॉलेजमध्ये असताना नाटय़विषयक उपक्रम राबवणारी ‘विथी’ नावाची एक संस्था कॉलेजमध्येच कार्यरत होती आणि त्यामार्फत तो विविध एकांकिका करू लागला. आय.एन.टी. एकांकिका, युथ फेस्टिव्हल अशा विविध आंतरमहाविद्यालयीन महोत्सवात तो एकांकिकेत सहभागी व्हायचा. बक्कल नंबर 204, क्रोमॅन, सेल्फीमग्नता या एकांकिकेत तेजसने भूमिका केल्या. ‘सेल्फीमग्नता’मधील भूमिकेसाठी त्याला आय.एन.टी.मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. इंद्रधनू, मुंबई या संस्थेतर्फे त्याने ‘विभवांतर’ एकांकिकेतदेखील भूमिका केली. कॉलेजमध्ये असता त्याला ‘स्टुडन्ट ऑफ दि इअर’ हे ऍवॉर्डदेखील मिळाले आहे. ‘तू माझा सांगाती’मध्ये तेजसची भूमिका होती. त्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात एका सिजनमध्ये त्याने अनेक स्किट्स सादर केली.

तेजस म्हणतो, माझ्या अभिनय कलेचे श्रेय अर्थातच आमच्या कॉलेजमधील ‘विथी’ संस्थेला आहे. लॉकडाऊनचा काळ हा प्रत्येकासाठी आव्हानात्मक होता. त्यावेळी मी भरपूर वाचन केलं, अनेक वेब सीरिज पाहिल्या. आता ‘तुमची मुलगी काय करते’मधील माझी ‘विश’ ही नकारात्मक व्यक्तिरेखा मला आव्हानात्मक वाटते. त्यापूर्वी ‘नवे लक्ष्य’मध्येदेखील मी नकारात्मक भूमिका केली होती. ‘विश’ ही व्यक्तिरेखा पाहून मला जेव्हा लोक म्हणतात की, तुझा आम्हाला राग येतो, तेव्हा ती त्यांनी मला दिलेली पावती असते.

नुकतेच ‘एपिलॉग’ नामक एक वेब फिल्म यूटय़ूबवर रिलीज झाली आहे. त्यातही तेजसची भूमिका आहे. भविष्यात त्याला वैविध्यपूर्ण भूमिका करून एक लोकप्रिय अभिनेता व्हायचे आहे.