चॅलेंजिग भूमिका आवडतात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’चीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. टिझरपाठोपाठ नुकताच रिलीज झालेला सिनेमाचा ट्रेलर सगळ्यांची उत्सुकता वाढवतोय. ‘अगंबाई अरेच्या 2’, ‘फुंतरू’ या सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा नव्या दमाचा अभिनेता शिवराज वायचळ यात मुख्य भूमिकेत आहे. यात तो प्रकाश नावाच्या पुण्यातील तरुणाची भूमिका साकारतोय. यानिमित्त त्याच्याशी साधलेला संवाद.

‘वेडिंगचा शिनेमा’विषयी सांग?
– हा कौटुंबिक मनोरंजन देणारा सिनेमा आहे. हल्ली जवळपास प्रत्येक जोडपे लग्नापूर्वी प्री वेडिंग शूट करते. प्री वेडिंग शूट करताना त्याच्यामागे काय गमतीजमती घडतात याचे चित्रण तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेल. प्रत्येकाला आपले प्री वेडिंग शूट सर्वात हटके करावेसे वाटते, पण प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही, अशी मजेशीर कथा या सिनेमात आहे.

डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
– जितक्या सहजपणे ते पेटी वाजवतात आणि गातात तितक्याच सहजपणे त्यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. कथा-पटकथा त्यांचीच असल्याने सिनेमातून ते कशाप्रकारे मांडायचं याबाबत ते क्लियर होते. अतिशय शांतपणे ते सगळ्यांकडून काम करून घ्यायचे. एकाच सिनेमात मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, प्रवीण तरडे, संकर्षन कऱहाडे अशा दिग्गज कलाकारांना एकत्र आणण्याची किमया त्यांनी साधली आहे.

इतक्या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना दडपण येते का?
– दडपण येत नाही. उलट या दिग्गज कलाकारांकडून मला काही ना काही शिकायला मिळाले. शेवटी प्रत्येक अभिनेत्याची काम करण्याची शैली वेगवेगळी असते.

तुझ्या ड्रीम रोलबद्दल सांग?
– माझा कोणताही ड्रीम रोल नाही. पण अभिनेता म्हणून मला कोणत्याही चौकटीत अडकायचे नाही. कलाकार म्हणून मला वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची भूक आहे. कोणतीही भूमिका पूर्णपणे आवडत नाही तोपर्यंत मी ती स्वीकारत नाही. चॅलेंजिंग भूमिका जास्त आवडतात.

30
माझे दोन सिनेमे लवकरच रिलीज होणार आहेत. याशिवाय एका वेबसीरिजवर काम करतोय. थिएटरऑनची ही पहिली वेबसीरिज आहे. या वेबसीरिजचे अर्धे शूटिंग पूर्ण झाले आहे. अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, शिवानी रांगोळे, प्रवीण तरडे, पुष्कर जोग यांच्या मुख्य भूमिका आहेत.