…तेथे कर माझे जुळती!

 >> संजीवनी धुरी-जाधव

तेजस्विनी पंडित… कोरोना योद्धय़ांचे आभाळभर काम… त्याविषयी कृतज्ञता कशी व्यक्त करायची… ग्लॅमर हे तेजस्विनीचे शस्त्र. नवरात्रीचे निमित्त, दुर्गा भवानीचे सौंदर्य या साऱयांचा मेळ घालून तिने कोरोना योद्धय़ांना अनोखी मानवंदना दिली आहे. यानिमित्ताने तिच्याशी गप्पा…

सध्या सोशल मीडियावर तेजस्विनी पंडीत तिच्या फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या फोटोशूटमध्ये कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून, कुटुंबाचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावणाऱया स्त्री शक्तीला मानवंदना दिली आहे, तिच्या या फोटोशूटबाबत जाणून घेऊया….

सगळीकडेच कोरोना नावाचे महाभयंकर सावट आहे. त्यामुळे यंदा आम्ही कोरोनाकाळात कर्तव्य बजावणाऱया महिला कर्मचाऱयांना फोटोशूटद्वारे मानवंदना दिली आहे. ज्यांनी या काळात कर्तव्य बजावले आहे त्या सगळ्या महिला म्हणजे देवीचे रूपच आहेत. त्यामुळे हा सलाम त्या दैवीकर्मांना आहे. त्यामुळे यंदा आम्ही आमच्या फोटोशूटमधून ही संकल्पना मांडली आहे. यंदा आमचे चौथे वर्ष आहे. आतापर्यंत पहिल्या दिवशी डॉक्टर, दुसऱया दिवशी पोलीस, तिसऱया दिवशी सफाई कामगार, चौथ्या दिवशी शेतकरी महिला अशी विविध रूपं पाहायला मिळाली आणि पुढच्या पाच दिवसांत आणखी रूपं पाहायला मिळतील. या सगळ्यात केवळ नऊ विभागांनीच कामं केलं असे अजिबात नाही. कामं बऱयाच लोकांनी केली. त्यातील निवडक नऊ आम्ही घेतलेले आहेत. त्यांचे या फोटोशूटच्या माध्यमातून आभार मानतोय.

माझ्यासाठी हे सगळं मांडण्यासाठी उत्तम माध्यम माझं क्षेत्र आहे. कारण याच्यापेक्षा मोठय़ाने माझ्या क्षेत्रात मी आवाज दिल्याशिवाय कोणी ऐकणार नाही. प्रत्येक वेळेला मी हे लोकांसाठी करत नाही. आम्ही टीम एकत्र बसतो. आम्हाला जे समाजात जाणवतं त्याच्याविषयी मांडलेली ही सिरीज असते. यावर्षी मनात खदखदणाऱया बऱयाच गोष्टी होत्या, पण मला असे वाटले की, आजूबाजूला इतक्या नकारात्मक गोष्टी होत्या की त्याच्यामध्ये आपण काहीतरी चांगलं करूया, आपण त्यांना कृतज्ञता दाखवूया. त्या दैवी कर्मांना सलाम करूया. असं म्हणून या वर्षीची थीम केली. पण पुढच्या वर्षी मला काही करावेसे वाटले नाही तर मी नाही करणार. दरवर्षीच असं फोटोशूट करणार असं नाहीय. लाइक्स, शेअर्स, फॉलोअर्स त्यासाठी मी करतच नाहीय. मला वाटतं मला हे नऊ दिवस मिळतात या नऊ दिवसांत वर्षभरात ज्या भावना असतात त्या भावना माझ्या क्षेत्रात राहून वेगळ्या पद्धतीने मांडते. काही लोक बोलतात, तुम्ही स्वतःला देवीचं रूप का दिलंय, तुम्ही स्वतःला देवी समजता का, तुम्ही मास्क का नाही घातले आहे. तर पहिला मुद्दा आहे, मी जर मास्क घातले तर ते रूपच दिसणार नाही. आजूबाजूच्या सगळ्यांना मास्क घातला आहे फक्त मी नाही घातला आहे. कारण ते देवीचे रूप आहे आणि मी माझ्या माध्यमातून प्रतिनिधित्व करतेय. दिसायला जरी माणूस असली तरी कर्म दैवी आहेत. त्यांना केलेला सलाम आहे. त्या त्या वेशात आम्ही हे फोटोशूट करतोय, कारण तेच आहे की आम्हाला त्या त्या लोकांना मानवंदना द्यायचीय. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रोल बरेच करतात, त्यांना चेहरे नसतात, त्यामुळे ट्रोलर्सकडे मी दुर्लक्ष करते.

दैवी कर्मांना ही मानवंदना
आपल्यासाठी घराबाहेर येऊन काम करत आहेत, ती सगळी देवमाणसं आहेत. आपल्याशी काहीच संबंध नसताना ती आपल्यासाठी झटत असतात. तर ही देवमाणसं आहेत, त्यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न या वर्षी केलेला आहे, त्यांच्या दैवी कर्मांना ही मानवंदना आहे. मला असे म्हणायचेय की डॉक्टर माणूस असतो. देव देवच असतो. पण त्यांची कर्म आहेत ती देवमाणसासारखी आहेत. तर हेच मांडण्याचा प्रयत्न माझ्या फोटोशूटद्वारे केलेला आहे. आपण यावर्षी परोपकाराची भावना जास्त शिकलो.

फोटोशूटसाठी मेहनत
एक तर कॉन्सेप्ट आणि आयडियावरती जास्त मेहनत घ्यायला लागते. पुढच्या गोष्टींची आपण काळजी घेतो. मग कपडे, डिझाईन वगैरे मॅनेज करता येते. महत्त्वाचे म्हणजे यावेळची आमची जी टीम आहे ती घरचीच आहे. मग आमचे इनमिन घरचे सदस्यच होते. ज्यांनी फोटो काढले ते विविन पुलन हे आमचे नातेवाईक आहेत, माझी बहीण कपडय़ांना इस्त्र्ााr करते, माझे जिजू लायटिंग करत होते, डिझाईन आणि ईलूस्ट्रेशन हे उदय मोहिते यांचे आहे, तर लेखक नाशिकचा आरजे अधिश आहे. या फोटोशूटची संकल्पना आणि दिग्दर्शन धैर्य यांचे आहे. सगळ्यांचं टीमवर्क या सिरीजमधून दिसतं.

आपली प्रतिक्रिया द्या