नाटकवेडा!

633

>> मिलिंद शिंदे

संदेश कुलकर्णी. नाटक हा त्याचा श्वास आहे. त्याच्या दिग्दर्शनातून नाटक समोरच्या कलावंताच्या मनात उतरतं.

सखाराम बाईंडर’च्या निमित्तानं त्याची माझी भेट झाली. तसा तो आधीही ओळखीचा होताच; पण जाणणं ज्याला म्हणतात ते ‘सखाराम बाईंडर’ या नाटकाच्या निमित्ताने झाले. ‘ती फुलराणी’ नाटकात अमृता सुभाष काम करायची. त्या निमित्ताने आमची ओळख होती. नंतर त्यांनी विवाह केला. अमृता सुभाष मुंबईत आली, स्थिरावली. तिच्या मागे एक भक्कम खांब म्हणून सदैव उभा होता. एखाद्या अभेद्य खडकासारखा तो संदेश कुलकर्णी. प्रायोगिक रंगभूमीच्या वळणावरचं अतिशय उजवं नाव.

‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ नावाचा सिनेमा आला तो विजय तेंडुलकरांनी पाहिला. आणि संदेश दिग्दर्शित करीत असलेल्या त्यांच्याच नाटकात मला सर्वानुमते काम करण्याचा योग आला. तेंडुलकरांचं नाटक, दिग्दर्शक संदेश कुलकर्णी. मी थोडासा भयभीत होतो. कारण तेंडुलकरांचं नाटक करायचं. ते तालमींना अधनंमधनं यायचे. त्यांचे शब्द फार बदललेले त्यांना चालत नसत. मला घाबरायला व्हायचं. पण संदेश होता. मला किती जमतं आणि मला काय जमत नाही याची त्याला माहिती होती. सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी (संदेशची बहीण), चिन्मयी सुर्वे, (सुमीत) विनोद लव्हेकर असे आम्ही त्यात  होतो. तालीम रंगशारदा वांद्रय़ाला असायची. सगळय़ांच्या व्यस्ततेनुसार संदेश आणि अमृतानं वेळापत्रक बेतलं होतं. अतिशय बरहुकूम तालीम आकार घेत होती. सगळय़ात नवखा मी असल्याने मला आधार संदेशचाच होता. पण तो नाटक दिग्दर्शित करतोय असा त्यानं कधी मला फीलच येऊ दिला नाही, इतकं सहज त्यांनी आम्हा सगळय़ांकडून त्याला हवं असलेलं नाटक घडवून आणलं. बऱयाचदा दिग्दर्शक जेव्हा नाटक उभं करतो तेव्हा त्याचा आरडाओरडा, धाक, त्याचा रुबाब, दिग्दर्शक असण्याची असणारी (नसणारी) पोज आपल्याला जाणवत राहते. सतत कुणीतरी आपल्याला मॉनिटर करतंय, कुणीतरी आपलं मूल्यमापन करतंय, कुणीतरी आपल्याला एका कसोटीवर जोखतंय असं वाटत राहतं ते इथं काहीच नव्हतं. त्याची तालीम घेण्याची तऱहा निराळीच होती. तो आवाज वाढवत नाही. हलकेच समजावून सांगतो. उगाच मी खूप अभ्यास केला आहे या सदर नाटकाचा आणि पहा आता मी तुम्हाला कसं उलगडून सांगतोय. काही म्हणजे काही नाही. तो त्याला नाटकात तुम्ही करत असलेली भूमिका तुमच्यातून बेमालूमपणे काढून घेतो. तालमींदरम्यान त्याची अशी काही बसायची खुर्ची नसते. तो कुठेही उभा राहतो. तो तुमच्याकडे रोखून पाहत नाही. तो तुमचं तुम्हाला करायला देतो…करु देते…जर तुम्ही त्याच्या मनातल्या ट्रकवरून हलायला लागलात की तो तुम्हाला त्याला हव्या असलेल्या ट्रकवर कधी आणतो ते तुम्हाला कळत नाही. इतकं बेमालूम. आतापर्यंत समस्तांस दिग्दर्शक म्हणजे आरडाओरडा, बॉसिंग, धाक, भीती इतकंच होतं. या सगळय़ा टर्मस्ना फाटा देणारा संदेश आगळाच आहे. ‘सखाराम’ झालं. तेंडुलकरांना आवडलं. त्यांचा आलेला फोन हा माझ्यासाठी मोठा ठेवा आहे. त्यावर सविस्तर लिहीनच.

‘पुरुषोत्तम करंडक’ या पुणे विद्यापीठाअंतर्गत होणाऱया आंतमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या निमित्तानं संदेश मला पहिल्यांदा जाणवला. पुरुषोत्तम करंडक हे एक पर्वच आहे. जे जे या मांडवाखालून गेले आहेत, त्यांना या स्पर्धेचं महत्त्व माहीत आहे. आणि या मांडवाखालून गेलेला प्रत्येकजण जरी कलावंत नाही झाला तरी तो समृद्ध झाला आहे आणि जे कलावंत झाले ते आज सिनेमासृष्टीतले सितारे झाले. त्यातलंच एक महत्त्वाचं नाव संदेश कुलकर्णी. त्यांची मी ‘पार्टनर्स’ ही एकांकिका मी पाहिली होती. आणखीही बऱयाच आहेत, पण   ‘पार्टनर्स’ ने करंडक उचलला होता म्हणून मला माहीत आहे आणि ‘साठेचं काय करायचं’ हा इतिहास घडवणारा दीर्घांक. संदेशचं दिग्दर्शक म्हणून उजवंपण सदैव अधोरेखित करत राहिलं आहे. राहीलही… त्याची पत्नी अमृता सुभाष आणि निखिल रत्नपारखी हे दोघे तो प्रयोग अगदी जगत असत. मी हा प्रयोग दादर, माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये पाहिला होता. अमृता आणि निखिल केवळ अद्वितीय आणि त्यांचा दिग्दर्शक संदेश कुलकर्णी पदोपदी त्याचं अस्तित्व जाणवू देत होता. इतकी सफाई त्या दीर्घांकात होती. भारावून गेलो होतो. मुंबईत नवखा होतो. असं पाहिलं की कॉम्प्लेक्स यायला होतं. नंतर मित्र झालो. सखाराम झालं. मैत्र घट्ट झालं. अलीकडे जास्त मैत्री होत नाहीत, पण काही पाहिलं, वाचलं की बोलणं होतच होतं.

‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ या नाटकातला त्याचा अभिनय केवळ लाजवाब. ज्यांनी ज्यांनी हे नाटक पाहिलंय त्यातला संदेश कुलकर्णी याचा अभिनय सगळय़ांना अचंबित करून गेला. तो जेवढा उत्तम दिग्दर्शक आहे. तितकाच तो उत्तम अभिनेताही आहे. संदेशनं दिग्दर्शित केलेला ‘मसाला’ हा सिनेमाही त्याचं एक वेगळं वैशिष्टय़ सांगून गेलाय. मित्रा संदेश, तू भारीच आहेस. तुझ्या नव्या कलाकृतीची मनोभावे वाट पाहत आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या