गुंतवणुकीची करा घाई, डोईवर बसेल महागाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

    >>  चंद्रहास रहाटे  (आर्थिक सल्लागार)

महागाई खरं तर आपल्या आयुष्यात खूप मोठी भूमिका बजावत असते. तिच्याकडे जर कानाडोळा केला तर मात्र ती सरळ आपल्या डोक्यावरच येऊन बसते.

जरा आठवा. वीस वर्षांपूर्वी आपल्या घरचा खर्च किती होता… अगदी छान राहूनदेखील पाच हजारांपेक्षा जास्त खर्च नसेल, पण आज 20 वर्षांनंतर हाच खर्च 40 हजार इतका झाला आहे व तोही अपुराच पडतोय. ही महागाई वाढलीय जवळपास 11 टक्के दराने. आपल्या खर्चांपैकी असलेले घटक वेगवेगळय़ा दराने वाढले असतील, पण सर्वांनी मिळून 11 टक्के महागाईचा दर दिला. यापैकी जर विचार केला तर अन्न, शिक्षण, वस्त्र जास्त  दराने वाढले तर इलेक्ट्रोनिक वस्तूंचा महागाईचा दर कमी होत गेला, पण सर्वांनी मिळून 11 टक्के दराने महागाई वाढविली असं म्हणता येईल. आतापासून पुढे जर गणित मांडायचं असेल तर पूर्वीच्या मानाने महागाई कमी झालीय. तरीही सर्वसाधारण 8 टक्के दराने महागाई वाढेल असं आपण गृहीत धरू शकतो. विकसित देशामध्ये महागाईचा दर अगदी 2 टक्के ते 3 टक्क्यांपर्यंत अत्यल्प असतो, पण हिंदुस्थानसारख्या विकसनशील देशात व अविकसित देशात हाच दर जास्त आहे.

त्यामुळे आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या गरजांबाबतीत गाफील राहिलो तर मात्र याच गरजा आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतील. मित्रांनो, वेळ कुणासाठीच थांबत नाही. त्यामुळे जागरूक होऊन आपण त्यावर उपाययोजना करण्याची अत्यंत  गरज आहे. तर पाहूया आज असलेल्या आपल्या गरजांचे खर्च भविष्यात कुठंपर्यंत पोहचतील.

मुलांच्या उच्च शिक्षणाचा विचार केला तर इंजिनीअरिंगला आज चार वर्षांचा खर्च साधारण 20 लाख असेल. पुढल्या 15 वर्षांत हाच खर्च 8 टक्के महागाईच्या दराने 63 लाख 44 हजार 338 एवढा होईल. हाच जर वैद्यकीय शिक्षणाचा खर्च असेल तर तो आज 40 लाख असेल तर तो 8 टक्के महागाईच्या दराने 1 कोटी 26 लाख 88 हजार 676 एवढा कोटय़वधींच्या घरात जाईल.

अतिउच्च शिक्षणाचा आजच आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा दोन वर्षांचा खर्च 60 लाखांपर्यंत जातो. आजपासून तो 15 वर्षांत 8  टक्के महागाई दराने 1 कोटी 90 लाख 33 हजार 014 एवढा साधारण 2 कोटींच्या घरात जाईल.

भविष्यात येणारी मुलांच्या लग्नाचा खर्चही याच पद्धतीने वाढत जाणार आहे. मग या सर्व गरजा समोर येतील तेव्हा मुलांना सबबी देऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या शिक्षणापासून परावृत्त करायचे की शिक्षणाचे कर्ज घेऊन निवृत्तीच्या वयात आर्थिक भार वाढवायचा की आजच बचतीला सुरुवात करून या सर्व खर्चाची तरतूद करायची हे आपले आपणच ठरवायला हवे.

 निवृत्तीच्या नियोजनाबद्दल बोलायचे झाल्यास आज आपला खर्च दरमहा 50 हजार असेल तर तो पुढल्या 15 वर्षांत 8 टक्के दराने 1 लाख 58 हजार 608 दरमहा होईल. या खर्चाची तरतूद जर पुढली 25 वर्षे जर आपणास करायची असेल तर सर्वसाधारण 4 कोटी 75 लाख 82 हजार 400 म्हणजेच जवळपास 5 कोटी लागतील.

हे सर्व खर्च वाचून घाबरून जाऊ नका. माझ्या पुढील लेखात या सर्व खर्चाचे कसे नियोजन करता येईल याचा अभ्यास करूया. आपले खर्च अजूनही 15, 20 व 25 वर्षांच्या टप्प्यावर असतील तर अजूनही वेळ आपल्या हातात आहे. त्यामुळे काळजी करू नका. फक्त आजच बचतीचा संकल्प करून उपाययोजना सुरू करा.