पैसे गुंतवा मोठा परतावा मिळवा, आभासी रकमेचे आमिष दाखवून फसवणूक; 6 जणांची टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडातील एका कंपनीला प्रेशियस मेटल पॉट विकल्याने आम्हाला 55 हजार कोटी मिळाले आहेत. पण ती रक्कम आरबीआयमध्ये अडकली आहे. 27 कोटींचा टॅक्स भरल्यावर ती रक्कम मिळेल. जर नागरिकांनी टॅक्सची रक्कम भरण्यासाठी आमच्याकडे पैसे गुंतवले तर मोबदल्यात मोठा परतावा देऊ असे आमिष दाखवत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सहा भामटय़ांची टोळी मुंबई गुन्हे शाखा युनिट-7 च्या पथकाने गजाआड केली आहे.

शारदा (नाव बदललेले) यांना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडून माहिती मिळाली की भास्कर येगूपोगू यांना फायनान्सची आवश्यकता आहे.  त्यानुसार शारदा त्या ओळखीच्या व्यक्तीसह भास्करला भेटायला जुहू येथील जे. डब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये गेली आणि त्यानंतर भास्करने फसवणूक केली.  याप्रकरणी त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर युनिट-7 चे प्रभारी निरीक्षक मनीष श्रीधनकर, उपनिरीक्षक अतिष लोहकरे, माधवानंद धोत्र व पथकाने तत्काळ तपास करून भास्कर तसेच त्याचे साथीदार अरिंदम डे, राजविंद्र मेहरा, सुमीत पंजाबी, नियाझ आणि रुद्रानंद बाबाला अटक केली.

विश्वास बसावा म्हणून सरकारी कागदपत्रे

भास्कर आणि अरिंदम हे दोघे या टोळीचे मास्टरमाइंड आहेत. तर उर्वरित आरोपी हे नागरिकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडतात. तसेच नागरिकांचा आपल्यावर विश्वास बसावा यासाठी आरबीआय, डिफेन्स मिनिस्ट्री, पुरातत्व विभाग, ऍटोमिक एनर्जी रिसर्च सेंटर, जीओआय, बार्क आदी शासकीय संस्थांची बनावट कागदपत्रे तयार केल्याची आरोपींकडे सापडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.