कॅनडातील सर्वात मोठ्या सोने चोरी प्रकरणी दुबईहून परतलेल्या आरोपीला अटक; 180 कोटींचे सोने चोरी

कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सोने चोरीच्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पील प्रादेशिक पोलिसांनी ‘प्रोजेक्ट 24 के’ अंतर्गत एका मोठ्या आरोपीला अटक केली आहे. अरसलान चौधरी असे या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याला टोरंटो पियर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच ताब्यात घेण्यात आले. चौधरी हा दुबईहून विमानाने कॅनडात परतला होता. विशेष म्हणजे या आरोपीचा कोणताही निश्चित पत्ता नसल्याचे तपासात समोर आले आहे.

ही संपूर्ण घटना 17 एप्रिल 2023 रोजी घडली होती. स्वित्झर्लंडमधील झुरिच येथून एक विमान टोरंटो पिअर्सन विमानतळावर उतरले होते. या विमानातून सुमारे 400 किलोग्रॅम वजनाचे 6,600 सोन्याचे बार आणले गेले होते, ज्याची शुद्धता 9999 इतकी होती. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 20 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 180 कोटी रुपये इतकी होती. सोन्यासोबतच या विमानातून 2.5 दशलक्ष डॉलर्सचे परकीय चलनही आणण्यात आले होते. विमानतळावर माल उतरवल्यानंतर तो एका सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला होता, मात्र काही तासांतच हे सर्व सोने आणि रोख रक्कम गायब झाल्याचे समोर आले.

या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी सीमापार शोधमोहीम राबवली होती. तपासादरम्यान पोलिसांनी दहा संशयितांची ओळख पटवून त्यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. या कटात एअर कॅनडाच्या एका माजी कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. ब्रॅम्प्टन येथील रहिवासी असलेल्या 33 वर्षीय सिमरन प्रीत पानेसर याने एअरलाइनच्या कार्गो यंत्रणेत फेरफार करून हे मौल्यवान शिपमेंट वळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत अनेक अटक झाल्या असून अरसलान चौधरीच्या अटकेमुळे या तपासाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.