IPL 2020 – आयपीएलमध्ये नवा भिडू, अहमदाबाद नववा संघ होण्याची शक्यता

कोरोनाच्या काळातही आयपीएलला तुफान प्रतिसाद लाभला. त्यामुळे बीसीसीआयने 2021 सालामध्ये होणाऱया पुढील मोसमासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. पुढची आयपीएल स्पर्धा ही एप्रिल-मे या कालावधीत होणार असून यामध्ये एक संघ वाढवण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणारा नववा संघ अहमदाबादच्या रूपात असण्याची शक्यता आहे. तसेच त्याआधी खेळाडूंचा लिलावही होण्याचे संकेत बीसीसीआयकडून यावेळी देण्यात आले आहेत.

या वर्षी आयपीएलचा मोसम 10 नोव्हेंबरला पार पडला. 2021 सालामध्ये एप्रिल ते मे या कालावधीत पुढील आयपीएलचा मोसम खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडूंवर बोली लावण्याआधी योजना आखण्यासाठी कमी अवधी मिळत आहे असे काही फ्रेंचायझींचे म्हणणे आहे. पण नववा संघ विकत घेण्यासाठी काही काॅर्पोरेट सेक्टर तयार आहेत. त्यामुळे नवव्या संघासाठी खेळाडूंचा लिलाव होणे अपेक्षित आहे. यासाठी बीसीसीआय धावपळ करताना दिसत आहे.

जानेवारी-फेब्रुवारीत लिलाव

बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण खेळाडूंसाठीचा लिलाव जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत होईल अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. चार खेळाडूंना संघामध्ये कायम ठेवण्याची मुभा संघ मालकांना देण्यात येणार की नाही याबाबतही आताच काही सांगता येणार नाही.

आयपीएल हिंदुस्थानात होणार

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी आयपीएलचा पुढचा मोसम हिंदुस्थानातच खेळवण्यात येईल असे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते. गेल्या काही दिवसांमध्ये नवी दिल्ली वगळता इतर ठिकाणी कोरोना कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पुढील आयपीएल हिंदुस्थानातच होईल हे जवळपास निश्चित झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या