
आयपीएलच्या 14 व्या सत्राचा आता उत्तरार्ध सुरू झाला आहे. प्रत्येक संघाने 11-11 साखळी लढती खेळल्या असून सर्व आठ संघांच्या आता 3-3 साखळी लढती उरलेल्या आहेत. म्हणजेच 56 साखळी लढतींपैकी 44 लढती झाल्या असून केवळ 12 लढती शिल्लक आहेत. मात्र तरीही प्ले ऑफचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांना प्ले ऑफ गाठण्याची अधिक संधी असली तरी तांत्रिकदृष्टय़ा सर्वच संघ अजूनही शर्यतीत कायम आहेत. त्यामुळे कुठले चार संघ प्ले ऑफचे तिकीट बुक करणार याबद्दलचा थरार उत्तरोत्तर रंगत जाणार एवढे नक्की.
हैदराबाद को हारना मना है!
वृत्तपत्राच्या डेडलाइनमुळे गुरुवारच्या चेन्नई-हैदराबाद दरम्यान होणाऱया लढतीपूर्वी समीकरणानुसार हैदराबादच्या खात्यात केवळ 4 गुण जमा आहेत, मात्र त्यांच्या अजून चार लढती शिल्लक आहेत. त्यामुळे हैदराबादने सर्व लढती जिंकल्यास त्यांच्याकडे 12 गुण होऊ शकतात. मात्र हैदराबादला प्ले ऑफ गाठण्यासाठी कोलकाता, मुंबई, बंगळुरू व चेन्नई या चारही संघांना उर्वरित चार लढतींत हरवावे लागेल. शिवाय नेट रनरेटचेही समीकरण जुळायला हवे. त्यामुळे हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे.
चेन्नई, दिल्ली आघाडीवर
महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज आणि रिषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आयपीएलच्या गुणतालिकेत प्रत्येकी 16 गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱया स्थानावर आहेत (चेन्नई-हैदराबाद लढतीपूर्वीच्या आकडेवारीनुसार). त्यामुळे हे दोन संघ सहज प्ले ऑफमध्ये दाखल होतील असे वाटते. विराट कोहलीच्या बंगळुरू संघाच्या खात्यात 14 गुण जमा आहेत. त्यामुळे या संघालाही प्ले ऑफ गाठणे कठीण जाणार नाही असे वाटते. मात्र जो संघ सर्वप्रथम 18 गुणांची कमाई करणार तो अधिकृतपणे प्ले ऑफचे तिकीट बुक करून निश्चिंत होणार आहे.
चौथ्या स्थानासाठी असेल चुरस
कोलकाता व मुंबई या संघांकडे 10-10 गुण असून पंजाब व राजस्थानच्या खात्यात 8-8 गुण जमा आहेत. या सर्वांच्या 3-3 लढती शिल्लक आहेत. त्यामुळे या चारही संघांना एखादा पराभवही प्ले ऑफच्या शर्यतीतून आऊट करू शकतो. या चार संघांमध्ये या घडीला चौथ्या स्थानासाठी चुरस गृहीत धरावी लागेल. कोलकाता व मुंबई हे दोन संघ एखाद्या पराभवानंतरही जर-तरच्या समीकरणानुसार प्ले ऑफच्या शर्यतीत राहतील. मात्र पंजाब व राजस्थान यांनी एक सामना जरी गमावला तरी त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.





























































