पंचक कोणाचे? दिल्लीच्या विजयाचे की कोलकात्याच्या पराभवाचे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला मंगळवारी झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अवघ्या एक धावेने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाला मागे सारून रिषभ पंतचा दिल्ली कॅपिटल्सचा संघ उद्या ओएन मॉर्गनच्या कोलकाता नाइट रायडर्सशी लढणार आहे. यावेळी दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएलच्या या मोसमातील पाचव्या विजयाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला असेल. कोलकाता नाइट रायडर्सचा संघ मात्र पाचवा पराभव टाळण्यासाठीच मैदानात उतरेल. अहमदाबादमध्ये उद्याच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा संघ तिसरा पराभव टाळतोय की कोलकाता नाइट रायडर्सचा संघ तिसरा विजय मिळवतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

फलंदाजीत सुधारणेची गरज

कोलकाता नाइट रायडर्सने मागील लढतीत पंजाब किंग्जला हरवले असले तरी या संघात आणखी सुधारणा होण्याची गरज आहे. नितीश राणा व शुभमन गिल यांच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. दोघांनाही फॉर्ममध्ये येण्याची गरज आहे. तसेच राहुल त्रिपाठी, ओएन मॉर्गन, आंद्रे रस्सेल व दिनेश कार्तिक यांच्या कामगिरीतही सातत्य असायला हवे. शिवाय शिवम मावी, पॅट कमिन्स, सुनील नारायण, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवती यांना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे.

धवन, पंतवर मदार

दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजी विभागाची मदार शिखर धवन व रिषभ पंत यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा असेल. पृथ्वी शॉकडूनही मोठय़ा खेळीची अपेक्षा केली जात आहे. स्टीवन स्मिथऐवजी तिसऱया स्थानावर पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेला स्थान देण्यात यायला हवे असा सूर यावेळी उमटू लागला आहे. शिमरोन हेथमायरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत आपली धमक दाखवलीय. आता शिमरोन हेथमायरकडून त्याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची आशा दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाला असेल.

रबाडाला सूर गवसेना

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आतापर्यंत या मोसमात छान कामगिरी केलीय, पण काही बाबींमध्ये त्यांना सुधारणा करणे आवश्यक आहे. युवा गोलंदाज आवेश खान, अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यांच्यासह इशांत शर्मा व अक्षर पटेल यांनीही गोलंदाजीत आपली चमक दाखवलीय. वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा याला मात्र अद्याप अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. मार्कस स्टोयनीस याच्याकडून गोलंदाजी विभागात अपेक्षा बाळगल्या जात आहेत. कॅगिसो रबाडा व मार्कस स्टोयनीस यांना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

आजची आयपीएल लढत

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स; अहमदाबाद, रात्री 7.30 वाजता