IPL 2022 ‘इलेक्ट्रिशियन’च्या मुलानं मैदान गाजवलं, 8 चेंडूत ठोकले 42 रन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमिअर लीगच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली आहे. मुंबईला सलामीच्या दोन्ही लढतीत दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. पाच वेळच्या विजेत्या मुंबईला रविवारी झालेल्या लढती राजस्थान रॉयल्स संघाकडून 23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबईपुढे विजयासाठी 193 धावांचे आव्हान होते, मात्र मुंबईचा संपूर्ण संघ 20 षटकांमध्ये फक्त 170 धावा काढू शकला. मुंबईचा पराभव झाला असला तरी तिलक वर्मा या मुंबईच्या खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईचे एकामागोमाग एक खेळाडू बाद होत असताना तिलक वर्मा याने मैदानावर शड्डू ठोकला आणि आतषी खेळी केली. तिलक वर्माने 33 चेंडूत 61 धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 3 चौकार आणि 5 षटकार ठोकले, याचाच अर्थ या 8 चेंडूत त्याने 42 धावा काढल्या. 184.84 च्या स्ट्राईक रेटने त्याने राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली.

तिलक वर्मा याने याआधी पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 15 चेंडूत 22 धावांची खेळी केली होती. मात्र या लढतीतही मुंबईचा पराभवाचा सामना करावा लागला होता. लिलावामध्ये मुंबईने तिलक वर्मा याच्यासाठी 1.70 कोटी रुपयांची बोली लावली होती. रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास आतापर्यंत तरी तिलक वर्मा याने खरा करून दाखवला आहे.

इलेक्ट्रिशियनचा मुलगा

तिलक वर्मा हैदराबादचा रहिवासी असून त्याचे वडील नम्बूरी नागराजू हे एक इलेक्ट्रिशन आहेत. एका सामान्य कुटुंबात जन्मल्यानंतरही तिलक वर्मा याने क्रिकेटचे वेड जपले. त्याच्या वडिलांनी त्याला साथ दिली, क्रिकेटच्या किटपासून सर्व गोष्टी पोट मारून पुरवल्या. आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या तिलक वर्माचे कुटुंब आजही भाड्याच्या घरामध्ये राहते.

रोहितने केले कौतुक

दरम्यान, सलग दुसऱ्या पराभवामुळे रोहितच्या संतापाचा पारा चढला आहे. पराभवाचे खापर रोहितने फलंदाजांवर फोडले आहे. मात्र रोहितने जसप्रीत बुमराह आणि मिल्स आणि तिलक वर्मा यांचे कौतुक केले. तिलक आणि ईशानने चांगली फलंदाजी केली, या दोघांपैकी एक जण जरी अखेरपर्यंत मैदानात टिकला असता तर चित्र वेगळे असते, असे रोहित म्हणाला.