
इंडियन प्रीमिअर लीगच्या पंधराव्या मोसमासाठी बंगळुरूमध्ये दोन दिवस लिलावप्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या 10 फ्रेंचाईजींनी तब्बल 551 कोटी रुपयांची उधळण करत 204 क्रिकेट खेळाडूंची खरेदी केली. ईशान किशन याच्यासाठी सर्वाधिक 15.5 कोटी रुपयांची बोली लागल, तर अनकॅफ खेळाडूंमध्ये आवेश खानसाठी 10 कोटी रुपये मोजण्यात आले. या लिलावावेळी मुंबई इंडियन्सने एका अशा खेळाडूवर पैसे लावले जो यंदाची आयपीएल स्पर्धा खेळणार नाही.
लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला मुंबईने 8 कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतले. आर्चरसाठी राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या तीन संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. मात्र अखेर मुंबईने बाजी मारत इंग्लंडच्या या खेळाडूला आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे 2 कोटी रुपयांची बेसप्राईज असलेल्या जोफ्राला चार पट अधिक पैसे मिळाले आणि मुख्य म्हणजे तो यंदाची स्पर्धा देखील खेळणार नाही. मग मुंबईने एका अशा खेळाडूसाठी एवढे पैसे का मोजले हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.
👀
— Jofra Archer (@JofraArcher) February 13, 2022
जोफ्रा आर्चर गतवर्षी देखील आयपीएल स्पर्धा खेळला नव्हता. तो सध्या दुखापतीमुळे ग्रस्त असून बऱ्याच कालावधीपासून क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. डिसेंबर महिन्यामध्ये त्याच्या डाव्या कोपऱ्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. सध्या तो फिटनेस प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे. याच वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकपही होणार असल्याने इंग्लंडचा हा प्रमुख गोलंदाज यंदा आयपीएल खेळणार नाही.
…म्हणून केलं करारबद्ध
मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमरासह सारखा हुकुमाचा एक्का आहे. विरोधी संघांना धूळ चारण्याची क्षणता त्याच्याकडे आहे. मात्र त्याचा साथिदार ट्रेन्ट बोल्टला राजस्थानने आपल्या गोटात 8 कोटी रुपये मोजून घेतले. त्यामुळे मुंबईने त्याच्याच तोडीच्या जोफ्रा आर्चरला 8 कोटी रक्कम मोजून आपल्या संघात घेतले. तो यंदा आयपीएल खेळणार नसला तरी आगामी तीन वर्षांसाठी मुंबईने त्याला करारबद्ध केले आहे. त्यामुळे पुढील दोन स्पर्धांमध्ये बुमराह आणि आर्चर ही जोडी आग ओकताना दिसेल.
शानदार रेकॉर्ड
जोफ्रा आर्चर याचा आंतरराष्ट्रीय स्तरासह आयपीएलमध्येही शानदार रेकॉर्ड आहे. आर्चरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 35 लढती खेळल्या असून यात त्याने 46 बळी मिळवले आहेत. 7.13 च्या इकोनॉमीने आणि 21.32 च्या सरासरीने त्याने हे बळी घेतले आहेत. फलंदाजीतही त्याने 195 धावांचे योगदान दिले आहे.



























































