
आयपीएल 2023 च्या 31 व्या सामन्यात पंजाब किंग्जने (PBKS) मुंबई इंडियन्सचा (MI) 13 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 8 गडी गमावून 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 201 धावाच करू शकला. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने 67 आणि सूर्यकुमारने 57 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने 4 षटकांत 29 धावा देत 4 बळी घेतले. त्याने शेवटच्या षटकात मुंबईच्या दोन फलंदाजांना लागोपाठ दोन स्टंप तोडत क्लीन बोल्ड केले.
पंजाब किंग्जच्या 215 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर इशान किशन अवघी एक धाव काढून बाद झाला. दुसऱ्या षटकात 8 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रोहित शर्माने कॅमेरून ग्रीनसोबत फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा 27 चेंडूत 44 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन यांनी धमाकेदार फलंदाजी केली. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी झाली. कॅमेरून ग्रीन 43 चेंडूत 67 धावा करून बाद झाला. दरम्यान, सूर्यकुमार यादवने 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण अर्शदीपने त्याला 57 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मुंबईला शेवटच्या दोन षटकांत 31 धावांची गरज होती. 19व्या षटकात 15 धावा झाल्या आणि विजयासाठी शेवटच्या षटकात 16 धावा करायच्या होत्या. पण अर्शदीपने शेवटच्या षटकात दोन बळी घेत केवळ दोन धावा दिल्या. आणि पंजाब संघ 13 धावांनी विजयी झाला.






























































