IPL 2023 – एक जागा तीन संघ; MI, RR, RCB साठी काय आहे प्लेऑफचं गणित, जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगचा 16वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्सने प्लेऑफचे तिकीट मिळवले असून चौथ्या स्थानासाठी तीन संघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत.

पहिल्या स्थानावर गुजरात टायटन्स तर दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचा संघ आहे. या दोन्ही संघात 23 मे रोजी पहिला क्वालिफायर सामना होईल. तर तिसऱ्या स्थानावरील लखनौ सुपर जायंट्सचा संघ 24 मे रोजी एलिमिनेटर सामना खेळेल. मात्र लखनौचा संघ कोणत्या संघाशी दोन हात करेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या तीन संघांमध्ये प्लऑफचे तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. आज पहिला सामना मुंबईला दुपारी साडे तीन वाजता सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तर बंगळुरुला सायंकाळी साडे सात वाजता गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी या तिन्ही संघांचे समिकरण काय आहे हे पाहूया…

मुंबई इंडियन्स –

पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ 14 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. मुंबईचा नेट रनरेट सध्या -0.128 आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. यासह बंगळुरुचा संघ अखेरच्या लढतीत पराभूत व्हावा अशी प्रार्थना करावी लागेल. मुंबई आणि बंगळुरु दोन्ही संघ आपापला सामना जिंकले तरीही मुंबई प्लेऑफला जाऊ शकते. फक्त मुंबईच्या विजयाचे मार्जिन बंगळुरुच्या विजयापेक्षा 80 धावांहून अधिक असावे. उदा. बंगळुरूने गुजरातला 10 धावांनी हरवले, तर मुंबईला 90 हून अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल.

राजस्थान रॉयल्स –

राजस्थान रॉयल्स 14 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थान सध्या देवाच्या भरवशावर आहे. राजस्थानचा नेट रनरेट +0.148 आहे. आज होणाऱ्या लढतीत मुंबईचा पराभव व्हावा आणि गुजरातनेही बंगळुरुलाही 5 पेक्षा जास्त धावांनी पराभूत करावे अशी प्रार्थना राजस्थानला करावी लागेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू –

बंगळुरुचेही 14 गुण असून नेट रनरेट +0.180 आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी बंगळुरुला गुजरातवर मोठा विजय मिळवावा लागेल. जर पराभव झाला तर तो 5 पेक्षा जास्त धावांनी नसावा याकडेही बंगळुरुला लक्ष द्यावे लागेल, तरच बंगळुरुचा नेट रनरेट राजस्थानपेक्षा चांगला राहील. तसेच मुंबईचाही पराभव व्हावा अशी प्रार्थना करावी लागेल.