हिंदुस्थानी फलंदाजांचीच बॅट ठोकतेय धावा; अव्वल दहा फलंदाजांमध्ये सात हिंदुस्थानी आणि तीन विदेशी

आयपीएलमध्ये देशी खेळाडूंच्या तुलनेत विदेशी खेळाडूंचीच चलती असते आणि तेच धावांची बरसात करतात, हेच चित्र आजवर दिसत आलेय. पण यंदा अर्ध्या टप्प्यावर पोहोचलेल्या आयपीएलमध्ये हिंदुस्थानी फलंदाजांचीच बॅट गोलंदाजांना ठोकत असल्याचे समोर आलेय. विशेष म्हणजे अव्वल दहा फलंदाजांमध्ये हिंदुस्थानचे सात तर विदेशी तीन फलंदाज फॉर्मात आहेत आणि धावा काढताहेत.

आयपीएलमध्ये हिंदुस्थानी फलंदाजांना गवसलेला सूर पाहून आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडू निवडताना हिंदुस्थानी निवड समितीला अनेक खेळाडूंवर अन्याय करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत आयपीएलच्या 33 सामन्यांत फलंदाजांकडून 55 अर्धशतके आणि सहा शतके ठोकली गेली आहेत. शतकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर जोस बटलरने दोन, ट्रव्हिस हेड आणि सुनील नारायणने प्रत्येकी एक शतक ठोकले आहे. म्हणजे चार शतके विदेशी खेळाडूंनी, तर दोन-दोन शतके विराट कोहली आणि रोहित शर्मा या हिंदुस्थानच्या दोन दिग्गजांकडून साजरी केली गेली आहेत. मात्र अर्धशतकांमध्ये 55 पैकी 32 शतके हिंदुस्थानच्या धुरंधरांनी ठोकली आहेत. हिंदुस्थानच्या रियान पराग आणि संजू सॅमसन या दोघांनी आपल्या बॅटची करामत दाखवताना 3-3 अर्धशतके ठोकून आपले नाव सर्वात पुढे ठेवले आहे.

टॉप टेन हिंदुस्थानचाच

आयपीएल सुरू झाल्यापासून विराट कोहलीने फलंदाजांच्या यादीत जे आपले अव्वल स्थान कायम राखले आहे त्याला तोड नाही. आता आयपीएलला दोन दिवसांत महिना होईल आणि महिनाभरात कोहलीच सर्वाधिक काळ अव्वल आहे. त्याने सात सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतके साजरी केली आहेत. या यादीत 22 वर्षीय रियान परागच्या फलंदाजांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 161 च्या स्ट्राईक रेटने चक्क 318 धावा केल्या आहेत. त्याने सात सामन्यांत 34, 23, 76, 4, नाबाद 54, नाबाद 84 आणि 43 अशा सातत्यपूर्ण खेळी केल्या आहेत. त्याच्याइतके सातत्य एकाही फलंदाजात दिसलेले नाही.

आयपीएलच्या टॉप टेनमध्ये रोहित शर्मा (297), संजू सॅमसन (276), शुबमन गिल (263), शिवम दुबे (242) आणि ऋतुराज गायकवाड (241) हे हिंदुस्थानीसुद्धा आहेत. त्यामुळे बोलबाला हिंदुस्थानी फलंदाजांचाच दिसतोय. सध्या तरी सुनील नारायण (276), हेन्रीक क्लासन (253) आणि जोस बटलर (250) हे विदेशी यादीत आपले स्थान राखून आहेत. विशेष म्हणजे अनेक स्टार विदेशी फलंदाज अद्याप आपल्या लौकिकास साजेसा खेळ करू शकलेले नाहीत. ग्लेन मॅक्सवेलने तर निराशाजनक खेळानंतर आयपीएलमधून ब्रेक घेतलाय तर डेव्हिड वॉर्नरच्या बॅटीतून सहा सामन्यात केवळ एकच अर्धशतक निघाल्यामुळे तोसुद्धा वेगळय़ाच मानसिकतेत वावरत आहे. जगभरातील अनेक दिग्गज सध्या आयपीएलमध्ये खेळत असले तरी त्यांची बॅट थंड आहे.