बंगळुरूचा खेळ खल्लास; सलग सहाव्या पराभवाची नामुष्की, आयपीएलमध्ये बाद होणारा पहिला संघ

शेवटच्या षटकात विजयासाठी 21 धावांची गरज असताना कर्ण शर्माने मिचेल स्टार्क चार चेंडूंत ठोकलेल्या 3 षटकारांनी सामना बंगळुरूच्या बाजूने झुकला होता. पण पाचव्या चेंडूवर शर्माचा अप्रतिम झेल स्टार्कनेच टिपत सामन्याला कलाटणी दिली. मग एका चेंडूवर तीन धावांची गरज असताना लॉकी फर्ग्युसनने फटका मारून जिवाच्या आकांताने धावत सुटला. क्षेत्ररक्षक पॉमी बांगवाने थ्रोही   स्टम्पच्या दिशेने नव्हता, पण फिल सॉल्टने मोठय़ा चपळाईने तो पकडला आणि झेप घेत स्टंप उडवत फर्ग्युसनला बाद केले. क्षणाक्षणाला सरडय़ाप्रमाणे रंग बदलणार्या या सामन्यात कोलकात्याने शेवटच्या चेंडूवर एका धावेने विजय नोंदवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले तर दुर्दैवी ठरलेल्या बंगळुरूला सलग सहाव्या पराभवाला सामोरे लागले. आठपैकी सातवा सामना गमावत तळाला अडकलेल्या बंगळुरूचा आयपीएलमधला खेळ खल्लास झाला आहे.

शनिवारी दिल्लीत धावा आणि षटकारांचा पाऊस पडला होता तर आज ते वारे कोलकात्याच्या दिशेनेही सुस्साट आले. कोलकात्याने फिल सॉल्टच्या 14 चेंडूंतील 48 आणि श्रेयस अय्यर (50), रिंकू सिंग (24), आंद्रे रसल (27) आणि रमणदीप सिंग (24) यांच्या फटकेबाजीमुळे 6 बाद 222 अशी आव्हानात्मक मजल मारली होती तर बंगळुरूने खराब प्रारंभानंतरही विल जॅक्स (55) आणि रजत पाटीदार (52) यांच्या अर्धशतकाने सामन्यात पुनरागमन केले आणि तळाच्या दिनेश कार्तिक आणि कर्ण शर्माच्या झंझावाताने 221 पर्यंत मजल मारली. एकाच सामन्यात दोन्ही संघांनी पुन्हा एकदा दोनशेचा टप्पा गाठला.

जॅक्स-पाटीदारचा शतकी पाठलाग

पहिल्या दोन षटकांत दोन षटकार आणि एक चौकार ठोकून विराट कोहलीने दमदार सुरुवात केली. पण तो हर्षित राणाच्या फुलटॉस चेंडूवर झेल देऊन बसला. त्याने नो बॉलचीही दाद मागितली, पण तिसऱया पंचांनीही त्याला बाद ठरवले. पुढच्याच षटकांत फाफ डय़ु प्लेसिसही बाद झाला आणि बंगळुरूची 2 बाद  35 अशी अवस्था झाली, मात्र या दोन धक्क्यानंतर फिल जॅक्स आणि रजत पाटीदार यांनी बंगळुरूला सुखद धक्का दिला. दोघांनी जोरदार पाठलाग करताना 48 चेंडूंत 102  धावांची भागी रचत बंगळुरूला विजयाच्या ट्रकवर आणले. दोघांनी प्रत्येकी पाच-पाच षटकार ठोकत सामना बंगळुरूच्या बाजूने फिरवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

रसेलने जादूची कांडी फिरवली

11 षटकांत 137 धावा करणाऱया बंगळुरूला 54 चेंडूंत 86 धावांची गरज होती. त्यांच्यासाठी हे माफक लक्ष्य होते, पण विंडीजच्या आंद्रे रसल आणि सुनील नारायणने जादूची कांडी फिरवली. आंद्रे रसलने सामन्यातील 12 व्या षटकांत अवघ्या चार चेंडूंत जॅक्स आणि पाटीदारला बाद करण्याची करामत केली. मग पुढच्याच नारायणने पॅमेरून ग्रीन आणि महिपाल लोमरूर यांची विकेट घेत बंगळुरूला हादरवले. 2 बाद 137 वरून त्यांची 6 बाद 155 अशी दुर्दशा झाली. मात्र त्यानंतर सुयश प्रभुदेसाई आणि दिनेश कार्तिकने सामना पुन्हा बंगळुरूच्या दिशेने फिरवला. आयपीएलमध्ये फिनीशरची चोख भूमिका निभावणारा दिनेश कार्तिकच्या बॅटीतून चौकार-षटकार निघत असतानाच तो स्वताकडे स्ट्राइक राखण्याच्या प्रयत्नात सोपा झेल देऊन बसला आणि पारडे पुन्हा कोलकात्याच्या बाजूने झुकले. मग शेवटच्या नाटयमय षटकांत कर्ण शर्माने डोळय़ाचे पारणे फेडणारे षटकार ठोकले, पण शेवट दुर्दैवी झाला आणि फर्ग्युसन धावबाद झाल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये जाण्याऐवजी बंगळुरू एका धावेने हरला. 27 धावा आणि 25 धावांत 3 मोलाचे विकेट घेणारा रसल सर्वोत्तम ठरला.

सॉल्टची तिखट खेळी

आपल्या झंझावाती फलंदाजीने आयपीएल गाजवत असलेल्या फिल सॉल्टच्या आक्रमक फटकेबाजीमुळे कोलकात्याला दोनशेचा टप्पा सहजपणे गाठता आला. त्याच्या षटकार-चौकारबाजीमुळे कोलकात्याने चार षटकांतच 55 धावांची सलामी दिली होती. त्यापैकी 48 धावा एकटय़ा सॉल्टच्या होत्या. 13 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकार खेचल्यानंतर सॉल्टला आयपीएलमधील वेगवान शतक ठोकण्याची संधी होती, पण तो षटकार ठोकण्याचा प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने फर्ग्युसनच्या षटकांत 6, 4, 4, 6, 4, 4 अशा फटके मारत 28 धावाही ठोकल्या. त्याच्या झंझावातानंतर कोलकात्याच्या धावगतीत फारसा फरक पडला नाही, मात्र त्यांचे विकेट पडत होते. कर्णधार श्रेयस अय्यरने रिंकू सिंगसह 40 तर आंद्रे रसलबरोबर 42 धावांची भागी रचत संघाला द्विशतकासमीप नेले. मात्र रसल आणि रमणदीपने शेवटच्या दोन षटकांत 36 धावा चोपून काढत कोलकात्याला 222 हा आकडा गाठून दिला.

कोहलीचे बंगळुरूसाठी 250 षटकार

आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीची प्रत्येक धाव नेहमी विक्रमी असते. मात्र आता त्याचा षटकारही विक्रमी ठरला आहे. कोलकात्याविरुद्ध दोन षटकार ठोकत त्याने आयपीएलमध्ये 250 षटकार पूर्ण केले आहेत आणि एकाच संघाकडून इतके षटकार ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. सतराव्या मोसमापर्यंत एकही षटकारवीर एका संघासाठी अशी कामगिरी करू शकलेला नाही. या सामन्यात कोहलीकडून सर्वांनाच मोठय़ा खेळीची अपेक्षा होती. तसेच त्यांच्या संघालाही स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजयाशिवाय पर्याय नव्हता, पण तो अपयशी ठरला. मात्र बाद होण्यापूर्वी त्याने दोन षटकार ठोकत आपल्या षटकारांचे अडीचशतक साकारले. त्यामुळे यापुढे कोहलीच्या बॅटीतून निघणारा प्रत्येक षटकार हा विक्रमीच असेल.