IPL 2024 – आता जिंकू किंवा मरू! राजस्थान-हैदराबाद आज क्वॉलिफायर-2 मध्ये भिडणार

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या क्वॉलिफायर-1 लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा दारुण पराभव करत फायनलमध्ये धडक दिली. मात्र आयपीएलच्या गुणतक्त्यात अव्वल दोनमध्ये राहिल्यामुळे हैदराबादला क्वॉलिफायर-2 लढतीतून अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळत आहे. राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजयरथ रोखून क्वॉलिफायर-2 मध्ये स्थान मिळविले आहे. आता आयपीएलची फायनल गाठण्यासाठी उद्या शुक्रवार, 24 मे रोजी राजस्थान-हैदराबाद यांच्यातील सामना म्हणजे ‘जिंकू किंवा मरू’ अशा स्वरूपाची असल्याने क्रिकेटप्रेमींचीही उत्कंठा टिपेला पोहोचली आहे.

गोलंदाजांवर मदार

राजस्थान आणि हैदराबादकडे तुफानी फलंदाज असल्याने जो संघ अचूक गोलंदाजी करणार तोच क्लॉलिफायर-2 लढतीत बाजी मारणार आहे. राजस्थानकडे ट्रेंट बोल्ट, आवेश खान व संदीप शर्मा असा वेगवान गोलंदाजी ताफा असून रविचंद्रन अश्विन व युझवेंद्र चहल अशी सर्वोत्तम फिरकीची जोडगोळी आहे. याचबरोबर हैदराबादकडेही कर्णधार पॅट कमिन्स व भुवनेश्वर कुमार या अनुभवी वेगवान जोडगोळीसह टी. नटराजन व शाहबाज अहमद असे प्रतिभावान फिरकी गोलंदाज आहे. त्यामुळे रथी-महारथी फलंदाजांनी सजलेल्या दोन्ही संघांना जो गोलंदाजी ताफा रोखण्यात यशस्वी होईल, तो संघ आयपीएलची फायनल गाठणारा दुसरा संघ ठरणार आहे.

खोलवर फलंदाजी उभय संघांची ताकद

राजस्थान व हैदराबाद या दोन्ही संघात एकाचढ एक खेळाडू आहेत. साखळी फेरीत उभय संघांमध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत हैदराबादने राजस्थानवर विजय मिळविला होता. खोलवर फलंदाजी ही दोन्ही संघांची ताकद होय. हैदराबादकडे ट्रव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नीतिशकुमार रेड्डी, हेन्रीच क्लासेन, अब्दुल समद, कर्णधार पॅट कमिन्स असा फलंदाजीक्रम आहे. राजस्थानकडेही यशस्वी जैस्वाल, कर्णधार संजू सॅमसन, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन असा तोडीस तोड फलंदाजी क्रम आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीत दोन्ही संघांच्या गोलंदाजांचा खरा कस लागणार आहे.

उभय संघ

सनरायझर्स हैदराबाद ः अभिषेक शर्मा, ट्रव्हिस हेड, हेन्रीच क्लासेन, एडेन मार्कराम, अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन, मयंक मार्पंडे, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंह, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, वाशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, जे. सुब्रमण्यन, सन्वीर सिंह, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारूकी, माकाx येनसन, आकाश महाराज सिंह, मयंक अग्रवाल.

राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार), आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, कुलदीप सेन, कुणाल सिंह राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, टॉम कोहलर-पॅडमोर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल, तनुश कोटियन.