
आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धा आता मावळतीकडे झुकली असून, साखळी फेरीच्या अखेरच्या टप्प्यात प्ले ऑफचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करत १८ गुणांची कमाई केली. मात्र, सरस नेट रनरेटच्या जोरावर बंगळुरूने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले. त्यामुळे आता २६ मे रोजी धर्मशाळा येथे बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात ‘क्वालिफायर-१’ रंगणार आहे.
गुजरातने यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवत १८ गुण गाठले होते. संघाचा नेट रनरेट +०.६९५ असून, ते दुसऱ्या स्थानी आहेत. हैदराबादनेही १८ गुणांपर्यंत मजल मारली, मात्र कमी नेट रनरेट (+०.५२४) मुळे त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता चौथ्या स्थानासाठी राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत रंगली आहे. पंजाबसमोर आज लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान असून, प्ले ऑफचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागणार आहे.
बंगळुरू-गुजरात टॉप-२मध्ये कायम
बंगळुरू आणि गुजरात या दोन्ही संघांचे १८-१८ गुण आहेत. मात्र ००.७८३ नेट रनरेटमुळे बंगळुरू अव्वल स्थानी आहे. गुजरात दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा ‘क्वालिफायर-१ ‘मधील प्रवेश निश्चित झाला आहे. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघालाही अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
हैदराबादची झुंज अपुरी
हैदराबादने बंगळुरूवर ५५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, टॉप-२मध्ये पोहोचण्यासाठी त्यांना ९१ धावांनी विजय आवश्यक होता. त्यामुळे शानदार विजय मिळूनही हैदराबादला तिसऱ्याच स्थानावर समाधान मानावे लागले.
पंजाबसाठी ‘करो या मरो’
१३ गुणांसह पंजाब पाचव्या स्थानावर आहे. लखनौविरुद्ध विजय मिळवणे पंजाबसाठी अत्यावश्यक बनले आहे. मात्र, त्याचबरोबर राजस्थान आणि कोलकात्याच्या निकालांकडेही पंजाबचे लक्ष लागलेले असेल.
राजस्थानसमोर सुवर्णसंधी
१४ गुणांसह राजस्थान सध्या चौथ्या स्थानावर आहे. त्यांचा अखेरचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळाल्यास राजस्थान थेट प्ले ऑफमध्ये धडक मारेल.
कोलकात्याच्या आशा कायम
कोलकात्याचेही १३ गुण आहेत. मात्र प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना दिल्लीविरुद्ध विजय मिळवण्याबरोबरच राजस्थान आणि पंजाबच्या पराभवाचीही प्रार्थना करावी लागणार आहे.
दिल्लीचे समीकरण कठीण
१२ गुणांसह दिल्ली सातव्या स्थानावर आहे. संघाचा नेट रनरेट (०.८७१) खराब असल्याने केवळ मोठ्या फरकाने विजय मिळवून उपयोग नाही, तर इतर संघांच्या निकालांवरही त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
मुंबई, चेन्नई, लखनौ स्पर्धेबाहेर
मुंबई, चेन्नई आणि लखनौ यांचे प्ले ऑफचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. चेन्नई सातव्या, मुंबई नवव्या, तर लखनौ तळाच्या स्थानावर आहे.



























































