
इंडियन प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 15व्या हंगामापूर्वी खेळाडूंचा महालिलाव सोहळा संपला. दोन दिवस चाललेल्या या महालिलावात 204 खेळाडूंची खरेदी झाली, त्यात 67 परदेशी खेळाडू विकले गेले. लिलावाच्या आधी 10 संघांनी एकूण 33 खेळाडूंना रिटेन केले होते. त्यातील 10 परदेशी खेळाडू होते. म्हणजेच आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 77 परदेशी खेळाडू स्पर्धेत सहभागी होतील. मात्र परदेशी खेळाडूंमध्ये वेस्ट इंडीजच्या सर्वाधिक 17 खेळाडूंना आयपीएल फ्रेंचायजींनी विकत घेतले आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे खेळाडू या शर्यतीत काहीसे मागे पडले आहेत. 77 परदेशी क्रिकेटपटूंवर सर्व फ्रेंचायजींचे मिळून एकूण 335.25 कोटी रुपये खर्च झाले.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केली होती सर्वाधिक नावनोंदणी
आयपीएल लिलावात या वर्षी हिंदुस्थाननंतर ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक खेळाडूंनी नावनोंदणी केली होती. मात्र टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजचे खेळाडू माहीर समजले जातात. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंपेक्षा विंडीजच्या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी सर्वच फ्रेंचायजींनी रस दाखवला. विंडीजनंतर ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या खेळाडूंना पसंती मिळाली असून त्यानंतर न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेचा नंबर लागतो. इंग्लंड संघाचा प्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेत दारुण पराभव झाला होता.
एक संघ आठ परदेशी खेळाडू घेऊ शकतो
आयपीएलच्या नियमानुसार एका संघाला 8 परदेशी क्रिकेटपटू आपल्या संघात घेण्यास परवानगी आहे. पंजाब किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनी प्रत्येकी 7 परदेशी खेळाडू खरेदी केले असून इतर सर्व संघांनी 8 परदेशी खेळाडू घेतले आहेत. प्रत्यक्ष आयपीएल सामन्यांत चारच परदेशी खेळाडू खेळविता येतात.
लिलावात विक्री झालेले वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू
वेस्ट इंडीजः (17 खेळाडू 81.45 कोटी रुपये): आंद्रे रस्सेल, निकोलस पुरन, जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, कायरॉन पोलार्ड, सुनील नारायण, ओडियन स्मिथ, ड्केन ब्राक्हो, रोकमन पाकेल, अल्जारी जोसेफ, इक्हन लुईस, डोमिनिक ड्रॉक्स, शेरफेन रदरफोर्ड, फॅमियन एलेन, ओबेड मॅकॉय, काईल मेयर्स.
ऑस्ट्रेलियाः (13 खेळाडू, 59.85 कोटी) : पॅट कमिन्स, डेक्हिड कॉर्नर, मिचेल मार्श, जोश हेजलकूड, डॅनियल सॅम्स, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन एबॉट, रिले मेरेडिथ, मॅथ्यू केड, नाथन एलीस, नाथन कुल्टर नाईल, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनीस.




























































