आयपीएलची रंगत आजपासून; चेन्नई-बंगळुरूत सलामीची लढाई

सामना ऑनलाईन । चेन्नई

जागतिक स्तरावरील नंबर वन ट्वेण्टी-20 लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचा थरार शनिवारपासून हिंदुस्थानात पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये चेन्नईत सलामीची लढत रंगणार असून यावेळी महेंद्रसिंग धोनी-विराट कोहली यांच्या ब्रिगेडमध्ये कोण बाजी मारतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आठ संघ आमने सामने उभे ठाकणार आहेत. 23 मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला 12 मे रोजी चेन्नईतच होईल. दरम्यान, इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपआधी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्यामुळे याकडे जगभरातील संघ रंगीत तालीम म्हणूनच बघताहेत हे विशेष.

प्रतिष्ठेच्या स्पर्धेआधी

आयपीएल ही स्पर्धा इंग्लंडमधील वर्ल्ड कपच्या बरोबर आधी होत असल्यामुळे खेळाडूंच्या फिटनेसबाबत सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. यामध्येही मतमतांतरे आहेत. काही तज्ञ या स्पर्धेकडे रंगीत तालीम म्हणून पाहताहेत तर काहींना वाटते यामुळे खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागू शकतो. वर्ल्ड कप या प्रतिष्ठsच्या स्पर्धेआधी प्रत्येक संघ आपआपल्या परीने प्रयत्न करील यात शंका नाही. आयपीएलचाही यामध्ये मोलाचा वाटा असेल असे यावेळी गृहीत धरायला हरकत नाही.

आयपीएलच्या प्रक्षेपणावर पाकिस्तानात बंदी

पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएल क्रिकेट सामन्यांच्या हिंदुस्थानातील प्रक्षेपणावर हिंदुस्थानने बंदी घातल्यानंतर आता एक महिन्याने पाकिस्तानने हिंदुस्थानात लवकरच सुरू होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या प्रक्षेपणावर पाकिस्तानने आपल्या देशात बंदी घातली आहे. याला पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी दुजोरा दिला आहे.

स्पर्धेतील सहभागी संघ

 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
 • चेन्नई सुपरकिंग्ज
 • दिल्ली कॅपिटल्स
 • किंग्ज इलेव्हन पंजाब
 • कोलकाता नाइट रायडर्स
 • मुंबई इंडियन्स
 • राजस्थान रॉयल्स
 • सनरायझर्स हैदराबाद

नवा चॅम्पियन मिळेल?

चेन्नई सुपरकिंग्ज व मुंबई इंडियन्स या संघांनी तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलाय. कोलकाता नाइट रायडर्सने दोन वेळा या स्पर्धेत बाजी मारलीय. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला या स्पर्धेत एकदाही चॅम्पियन होता आलेले नाही. बघूया या स्पर्धेत नवा चॅम्पियन मिळतो का ते…

या स्पर्धेतील आतापर्यंतचे विजेते

 • 2008       राजस्थान रॉयल्स
 • 2009       डेक्कन चार्जर्स
 • 2010       चेन्नई सुपरकिंग्ज
 • 2011       चेन्नई सुपरकिंग्ज
 • 2012       कोलकाता नाइट रायडर्स
 • 2013       मुंबई इंडियन्स
 • 2014       कोलकाता नाइट रायडर्स
 • 2015       मुंबई इंडियन्स
 • 2016       सनरायझर्स हैदराबाद
 • 2017       मुंबई इंडियन्स
 • 2018       चेन्नई सुपरकिंग्ज
आपली प्रतिक्रिया द्या