आता आयपीएल नसणार ‘टीम इंडिया’चे प्रवेशद्वार, बीसीसीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी चार तास चाललेल्या आढावा बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यात यापुढे आता केवळ एका आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे खेळाडूची लगेच ‘टीम इंडिया’त निवड होणार नाही. आयपीएलबरोबरच स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीचाही विचार करून मगच खेळाडूची हिंदुस्थानी संघात निवड होणार आहे.

‘टीम इंडिया’ने 2011 नंतर जगज्जेतेपद पटकावलेले नाही. 2013 नंतर हिंदुस्थानने आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाहीये. त्यामुळे 2023ची विश्वचषक स्पर्धा डोळ्यापुढे ठेवत ‘बीसीसीआय’ने केवळ आयपीएलमधील कामगिरीलाच महत्त्व न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. स्थानिक क्रिकेटमध्येही अनेक खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करत असतात. मात्र, आयपीएलला अधिक ग्लॅमर असल्याने यात चमकणाऱया खेळाडूसाठी ‘टीम इंडिया’चे दार सहज उघडले जाते. मात्र, आयपीएल गाजविणारे बहुतांश खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्लॉप ठरतात, असा अनुभव आहे. यावर बीसीसीआयने गंभीरपणे चर्चा केली. त्यामुळे आता केवळ आयपीएलच्या कामगिरीवर खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान देणे योग्य ठरणार नाही, यावर सर्व पदाधिकाऱयांचे एकमत झाले.

अतिरेक टाळा; फिटनेस पाळा!

आयपीएल खेळताना खेळाडूंवर सामन्यांचा अतिरेक नकोय. क्रिकेटपटूंना विश्रांती मिळते की नाही, यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला (एनसीए) लक्ष देण्याच्या सूचना ‘बीसीसीआय’ने दिल्या आहेत. हार्दिक पंडय़ा, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा, लोकेश राहुल अशा स्टार खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने ‘बीसीसीआय’ने चिंता व्यक्त केली. त्यामुळे आता आयपीएल फ्रेंचाईजींना आपल्या स्टार खेळाडूंना रोटेट करावे लागणार आहे.