
सामना प्रतिनिधी, ठाणे
‘तो’ माझा केवळ बॉडीगार्ड नव्हता तर तो माझे कान, नाक, डोळे होता. माझा छोटा भाऊ होता. भ्याड दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. देशासाठी तो शहीद झाला. आजच या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. पण जावेद अहमद दार ऊर्फ जेडी माझ्या हृदयात चिरंतन आहे. जेडीसारख्या ज्या 1 हजार 780 कश्मिरी पोलिसांनी भारतमातेसाठी आपले प्राण अर्पण केले त्यांचे हे बलिदान प्रत्येक देशवासीयाने लक्षात ठेवावे. ही भावना व्यक्त केली आहे कश्मीरचे ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे मूळचे ठाणेकर आणि दहशतवाद्यांचे कर्दनकाळ असलेले कश्मीरचे विशेष पोलीस अधीक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी…
शहीद कश्मिरी पोलीस जावेद अहमद दार ऊर्फ जेडी याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्याच्या आठवणी जागवणारी शैलेंद्र मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली ती मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाली. याबाबत दैनिक ‘सामना’ने त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा मिश्रा यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून केली.
2016 पर्यंत पोलीस अधीक्षक म्हणून माझ्याकडे शोपियान जिल्ह्याची जबाबदारी होती. या काळात जेडी माझा पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर होता असे सांगून मिश्रा पुढे म्हणाले, ‘डोळ्यांत तेल घालून जेडी माझे रक्षण करत होता. मी जेथे जायचो तेथे तो माझ्या पाठीशी असायचा. अनेकदा त्याच्यामुळेच मी मोहिमांवरून सुरक्षित माघारी परतलो आहे. आज जेडी आमच्यात नाही. डोळ्यांतील अश्रूंची गर्दी आवरून मी इतकेच सांगेन की, जेडीसारखे सुपुत्र कधीही मृत्यू पावत नाहीत ते अमर असतात.’
5 जुलै 2018 ला काय घडले?
27 जून 2018 ला शैलेंद्र मिश्रा यांची शोपियानमधून पोलीस मुख्यालयात बदली झाली. याचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला. जावेद दारवर वॉच ठेवलेल्या दहशतवाद्यांनी 5 जुलै 2018 रोजी त्यांचे अपहरण करून हत्या केली.
प्रत्येक कश्मिरीकडे संशयाने पाहू नका..
प्रत्येक कश्मिरीकडे संशयाने पाहू नका, असे आवाहन शैलेंद्र मिश्रा यांनी यावेळी केले. ते म्हणाले, हिंदुस्थानी लष्करासोबत ठामपणे उभे राहून लढणारे तिथले पोलीस कोण आहेत? ते कश्मिरी आहेत, स्थानिक आहेत. दहशतवाद्यांविरोधी लढय़ात त्यांची हिंमत आणि त्याग फार मोठा आहे. कारण हा लढा लढताना नंतर ते किंवा त्यांची कुटुंबे दहशतवाद्यांचे टार्गेट ठरतात. 2016 मध्ये जेडीच्याच गावात आम्ही एका दहशतवाद्याचा खात्मा केला तेव्हा जेडी या मोहिमेत पुढे होता. यानंतर माझे किंवा माझ्या कुटुंबाचे काय होईल याचा त्याने जराही विचार केला नाही. असे असंख्य निधड्या छातीचे पोलीस कश्मीरमध्ये रोजच लढतात. ते त्यांच्यात देशप्रेम जिवंत आहे म्हणूनच. त्यांचे बलिदान हा केवळ मृत पोलिसांचा आकडा ठरू नये. कश्मीरमधील 90 टक्के जनतेलाही दहशतवाद नको तर शांतता हवी आहे आणि केवळ त्यांच्या मदतीच्या बळावरच आम्ही आमच्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत.

























































