Iran-Israel War Effect – हिंदुस्थानकडे फक्त २५ दिवसांचा तेल साठा शिल्लक; नवीन पुरवठादाराचा शोधत सुरू, पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशांमध्ये वाढता तणाव आणि इराण-इस्रायल युद्धादरम्यान हिंदुस्थानकडे आता फक्त २५ दिवसांचा कच्चा तेल आणि शुद्ध तेलाचा साठा शिल्लक आहे. वृत्तसंस्था ‘एएनआय’ने सरकारी सूत्रांचा हवाला देत देशाच्या ऊर्जा सुरक्षेबाबत ही माहिती दिली आहे. यात सांगण्यात आले आहे की, सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि कच्चे तेल, एलपीजी आणि एलएनजीसाठी पर्यायी देशांशी वाटाघाटी करत आहे, जेणेकरून पुरवठा साखळीत कोणताही व्यत्यय येणार नाही, याची खात्री केली जाईल.

सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असले, तरी हिंदुस्थानात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्याची सरकारची तात्काळ योजना नाही. परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असून सध्या तरी दरवाढीचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहितीही ‘एएनआय’ने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

चिंतेचे कारण काय?

हिंदुस्थानला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी जवळपास ८५ टक्के तेल आयात केले जाते. इराण-इस्रायल संघर्षामुळे जर तेल उत्पादक क्षेत्रांना किंवा वाहतूक मार्गांना फटका बसला, तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, सध्या हिंदुस्थानकडे पुरेसा साठा असल्याने आणि सरकार पर्यायी मार्गांचा विचार करत असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात येत आहे.