खामेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात उद्रेक; अमेरिकन दूतावासावर हल्ला, गोळीबारात 12 आंदोलकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या लष्करी कारवाईदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात उमटले असून, संतप्त आंदोलकांनी कराची येथील अमेरिकन दूतावासावर भीषण हल्ला चढवला. आज झालेल्या या आक्रमक आंदोलनादरम्यान आंदोलकांनी दूतावासात घुसून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि मोडतोड केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक आणि अमेरिकन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात 12 आंदोलकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

खामेनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात आल्याच्या वृत्ताने कराचीमधील एम.टी. खान रोड परिसरात संतापाची लाट उसळली. हजारो आंदोलक अमेरिकन वाणिज्य दूतावासासमोर जमा झाले आणि त्यांनी अमेरिकेविरोधात घोषणाबाजी सुरू केली. आंदोलकांनी सुरक्षा भिंती ओलांडून दूतावासाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळी सुरक्षा दलांशी त्यांची मोठी चकमक झाली. जमावाला पांगवण्यासाठी सुरुवातीला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, मात्र आंदोलकांकडून गोळीबार आणि तोडफोड सुरूच राहिल्याने सुरक्षा दलांनी थेट गोळीबार केला. या गोळीबारात 12 जणांचा जीव गेला असून 30 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या रक्तरंजित संघर्षानंतर दूतावास परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली असून संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.