इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू, श्रीनगरपासून लखनौपर्यंत अनेक ठिकाणी आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर हिंदुस्थानातील अनेक भागांत शोक आणि निषेधाचे वातावरण पाहायला मिळत आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत खामेनेई ठार झाल्याच्या दाव्यानंतर जम्मू-काश्मीरसह देशातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

श्रीनगरमध्ये काश्मीरी शिया मुस्लिम समाजाने लाल चौक येथे खामेनेई यांच्या हत्येविरोधात निदर्शने केली. कारगिलमध्येही निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच उत्तर प्रदेशातील लखनौ येथे शिया मुस्लिम समाजातील नागरिक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत.

लखनौमधील शिया धार्मिक नेते मौलाना सैफ अब्बास यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “काल इस्त्रायल आणि अमेरिकेने केलेला हल्ला हा दहशतवादी हल्ला आहे. या घटनेमुळे संपूर्ण खाडी प्रदेश युद्धाच्या उंबरठ्यावर आला आहे. अमेरिका आणि इस्त्रायल जगभरात रक्तपात, द्वेष आणि दहशतवाद पसरवत आहेत, हे जगाने समजून घेतले पाहिजे.”

ते पुढे म्हणाले की, खामेनेई हे केवळ एका देशाचे नेते नव्हते, तर प्रत्येक पीडित, प्रत्येक मुस्लिम आणि प्रत्येक मानवतेचे नेते होते. “हा संघर्ष कुठे जाईल, हे कोणी सांगू शकत नाही; मात्र मला पूर्ण विश्वास आहे की इराण विजयी होईल,” असेही त्यांनी नमूद केले.

मौलाना कल्बे जवाद यांनी लखनौमध्ये नागरिकांना दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. रात्री 8 वाजता छोटे इमामबाडा येथे शोकसभा आयोजित करण्यात येणार असून त्यानंतर कॅंडल मार्च काढण्यात येणार आहे. देशभरातील शिया समाजाने एकाच वेळी शोकसभा आयोजित कराव्यात आणि शक्य त्या ठिकाणी कॅंडल मार्च काढावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.