
दिवाळीत घराघराची शोभा वाढवण्याचे काम आकाशकंदिल करतात. यंदाची दिवाळी अधिक तेजोमय, कलात्मक आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी ठाण्याच्या संदेश गावकर आणि लालबागच्या अभिषेक साटम या मराठी तरूणांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी ईरकल आणि पैठणीच्या साडय़ांपासून राजेशाही कंदील तयार केले असून त्याला राज्यभरातून मागणी आहे.
प्लॅस्टिकबंदी आणि चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे पारंपरिक कंदील खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढतोय. पारंपारिक कंदील तुलनेत महाग असले तरी हे कंदील दरवर्षी ग्राहकांना वापरता यावेत आणि ते सहज फोल्ड करून ठेवता यावेत, यासाठी ’सर्वांगी आर्ट्स’च्या संदेश गावकरने ईरकल साडीपासून कंदील तयार केले आहेत.
होम डेकोरचा भाग म्हणून वर्षभरही हे कंदील वापरता येतात. ईरकल साडी, लाकडाची रिंग, मण्यांची लेस आणि कॅलिग्राफीची सांगड घालून तयार केलेले हे आकर्षक कंदील पाच रंगात उपलब्ध आहेत.
पर्यावरणाबद्दलचे प्रेम आणि आपल्याला अवगत असलेल्या कलेची सांगड घालत अभिषेक साटमने ’हर्षाभि क्रिएशन’च्या माध्यमातून पैठणीपासून राजेशाही कंदील तयार केले आहेत. यात त्याला पत्नी हर्षदाची मोठी साथ मिळते.
पैठणीचा पदर आणि काठापासून बनवलेल्या या कंदीलांना पॅटर्न आणि रंगांवरून ’मयूर’, ’राजश्री’, ’अनन्या’, ’तेजोमय’, ’नभोमणी’, ’गुलकंद’ अशी नावे दिली आहेत. आपले उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही तरूणांनी सोशल मीडियावर पेज तयार केले आहे. त्याद्वारे राज्यभरातून त्यांना विचारणा होत आहे.





























































