
सामना प्रतिनिधी । धुळे
जिह्याच्या कृषी विकासासाठी सुलवाडे, जामफळ, कान्होली उपसा जलसिंचन योजना महत्त्वाची आहे. या योजनेसाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी २ हजार ३६० कोटी रुपये केंद्राकडून उपलब्ध करून घेतले. या योजनेच्या कामामुळे ७५ गावांमधील शेकडो एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
धुळे जिह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या सुलवाडे, जामफळ, कान्होली उपसा जलसिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध होणे महत्त्वाचे होते. या योजनेचे काम घेऊन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला. अखेरीस १९ जुलैला या योजनेला अंतिम मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निधीतून २ हजार ३६० कोटी रुपये देण्याची घोषणा झाली. या कामामुळे आता बोरी नदीच्या परिसरातील पंचवीस गावांचा कायापालट होणार आहे. निरनिराळे ९ मध्यम प्रकल्प होणार असून त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होईल. याशिवाय शिंदखेडा तालुक्यातील ५० गावांना पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील अनेक गावे सुजलाम-सुफलाम होतील. शेतकऱ्यांचा विकास व्हावा अशी प्रबळ इच्छाशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. त्यामुळेच इतकी मोठी रक्कम मंजूर झाली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अरविंद जाधव यांनी दिली.
निधीची घोषणा झाल्यानंतर लगेचच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे तालुक्यातील आर्वीजवळ असलेल्या पुरमेपाडा धरणाजवळ जाऊन फटाक्यांची आतिषबाजी करीत परस्परांना पेढे भरविले. त्या वेळी प्रा. जाधव यांच्यासोबत भाजपचे धुळे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब देसले, रामकृष्ण खलाणे, जितेंद्र जैन, राहुल पाटील, सरपंच भगवान देवरे, उपसरपंच मनोज साळवे, किशोर देवरे, विनायक केले, विश्वनाथ सोनवणे, युवराज हाके, संजय घोरपडे, सखाराम गर्दे, ज्ञानेश्वर गायकवाड, सुदाम देसले, ज्ञानेश्वर म्हस्के यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

































































