
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून आज सायंकाळी चार वाजता शेतीसाठी कालव्याद्वारे 500 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. टप्प्याटप्प्याने कालव्याचे पाणी वाढवले जाणार आहे. पाणीमागणी वाढल्यामुळे अखेर पाणी सोडण्यात आले आहे. आज सोडलेले पाणी 40 दिवस सुरू राहणार आहे. उजनीमधून कालव्यात सोडलेल्या पाण्यामुळे या हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे.
उजनीतून बोगद्यातून सोडण्यात आलेला विसर्ग आतापर्यंत 100 क्युसेक एवढा होता. त्यामध्ये आज दुपारी चार वाजल्यापासून वाढ करून तो 400 क्युसेक करण्यात आला आहे.
आतापर्यंत उजनी धरणातून बोगदा, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडले होते. कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर गेला होता. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असणाऱया शेतकऱयांतून संताप व्यक्त केला जात असल्याने उजनी प्रशासनाला पाणी सोडणे भाग पडले.
आज (दि. 17) दुपारी चार वाजल्यापासून मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करत उद्या रात्रीपर्यंत तो 2800 ते 3000 क्युसेक करण्यात येणार आहे. उजनी धरणात सध्या 100 टक्के पाणीसाठा आहे. सर्व बाबींचा विचार करून धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे शेतकरी थोडासा सुखावला आहे. या पाण्यामुळे कालव्यालगतच्या विहिरी व विंधन विहिरींना पाणी वाढते. त्यामुळे हे पाणी बंद झाल्यावर याचा फायदा होणार आहे.
आता उजनीत उपयुक्त पाणी 53.57 टीएमसी आहे. त्यात सध्या कालव्यात 500 क्युसेकने पाणी चालू आहे. म्हणजेच कालवा बंद होईपर्यंत आणखी 6 ते 8 टीएमसी पाणी कमी होणार आहे. हे पाणी उन्हाळ्याच्या 4 महिने पुरविणे गरजेचे आहे. यात केवळ योग्य नियोजनानेच साध्य होऊ शकते.



























































